बर्फाच्या वापराबाबत अनभिज्ञ असल्याचा कारखानदारांचा दावा; पालिकेचे कारवाईचे संकेत
मुंबईत ९९ टक्के बर्फ हा खाण्यायोग्य नसलेला बर्फ तयार करणाऱ्या कारखान्यांमधून येतो. आम्ही केवळ बर्फ पुरवतो, तो खाण्यासाठी वापरला जातो की साठवण्यासाठी ते आम्हाला कसे कळणार, असे सांगून हे कारखाने जबाबदारी टाळतात, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
पालिकेने केलेल्या कारवाईत दूषित बर्फ आढळल्यानंतर गेल्या आठवडय़ाभरात कुलाबा येथील खाण्याच्या बर्फ बनवणारा कारखाना तसेच शहरातील विविध भागातून बर्फाचे नमुने घेण्यात आले असून तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या बर्फात इ कोलाय आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त (अन्न) सुरेश अन्नापुरे यांनी स्पष्ट केले. बर्फ तयार करताना वापरलेल्या पाण्यासोबतच त्याची हाताळणी, वाहतूक, साठवण यामध्ये तो दूषित होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. त्यामुळे बाहेरचा बर्फ टाळणेच योग्य आहे, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी पद्मजा केसकर म्हणाल्या.
पाणीकपातीचा परिणाम
बर्फ तयार करण्यासाठी वापरलेल्या पाण्यावरून बर्फाची किंमत ठरत नाही. कारण पालिका किंवा एमआयडीसीकडून येणारे शुद्ध पाणी कमी किंमतीत मिळत असते. याउलट विहिरी किंवा कूपनलिकेतील पाणी टँकरने मागवण्यासाठी जास्त पैसे खर्च होतात. यावेळी तीन-तीन दिवस पाणी बंद असल्याने मुंबईबाहेरील परिसरातील बर्फ कारखान्यांचे कंबरडे मोडले. उत्पादन सुरू राहण्यासाठी मिळेल तेथून पाणी आणले गेले. त्यामुळे हा बर्फ अधिक दूषित असेल, अशी माहिती बर्फ कारखान्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
मच्छिमार सोसायटय़ांचे कारखाने
मुंबईत दूध, भाजी, मासे साठवून ठेवण्यासाठी बर्फाचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. मोठय़ा मच्छिमार संघटनांचे स्वतचे बर्फाचे कारखाने आहेत. मात्र बर्फाच्या आवश्यकतेच्या तुलनेत निर्मितीचे प्रमाण कमी असल्याने ठाणे, नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून बर्फ मागवला जातो. हा बर्फ साधारण १५०० रुपये प्रति टन या भावाने विकला जातो. एका टनमध्ये बर्फाच्या साधारण सात लाद्या असतात, अशी माहिती मढ मच्छिमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष किरण कोळी यांनी दिली. मुंबईत मढ, वर्सोवा येथे मच्छिमार सोसायटय़ांचे बर्फाचे कारखाने आहेत. याचसोबत ससून डॉक परिसरातील मोठय़ा मच्छीमार सोसायटींनी पर्यावरणाचे नियम व मुंबई महानगरपालिकेच्या जाचक अटींना कंटाळून मुंबईबाहेर बर्फाचे कारखाने काढले आहेत.
बर्फ कसा तयार होतो?
बर्फाच्या लादीचा आकार असलेल्या कंटेनरमध्ये नलिकेद्वारे पाणी भरले जाते. बर्फाची लादी हलकी होण्यासाठी त्यावर ११६० गुरुत्वाकर्षण बल तसेच पाण्यात मोठय़ा प्रमाणात मीठ मिसळले जातात. या कंटेनरभोवती काँम्प्रेसरमधून अमोनिया वायू सोडला जातो. अमोनिया वायूमुळे तापमान अत्यंत कमी होऊन पाण्यापासून बर्फ होतो. तयार करण्यात आलेला बर्फ वर्षभर साठवता येतो, अशी माहिती उत्तन येथील बर्फाच्या कारखान्यातील प्लाण्ट ऑपरेटर संजय कवालीधर यांनी दिली. मच्छिमार वाहतूक सोसायटीचा हा कारखाना पावसाळ्यातील वादळी वाऱ्यांमुळे मासेमारी बंद राहत असल्याने ऑगस्टपर्यंत बंद राहतो. या कारखान्यातील बर्फ केवळ मच्छिमारांना दिला जातो. मात्र अनेक खासगी कारखान्यातील बर्फ विविध दुकानदारांना विकला जातो. हा बर्फ हलका होण्यासाठी त्यात भरपूर मीठ वापरले जाते, अशीही माहिती त्यांनी दिली. एका टनमध्ये साधारण सात लाद्या असतात. एका लादीची किंमत २४० रुपये असते. बर्फाच्या कारखान्यांची क्षमता वेगवेगळी असते. चांगला बर्फ तयार होण्यासाठी साधारण ३६ ते ४८ तास लागतात. ४० टन क्षमता असलेल्या कारखान्यात १२- १२ तासांच्या दोन पाळ्यांमध्ये प्रत्येकी २० टन बर्फाची निर्मिती होते.
खाण्यायोग्य बर्फ कसा ओळखायचा?
पालिका किंवा एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रातून आलेल्या शुद्ध पाण्यापासून तयार केलेला बर्फ हा काचेसारखा पारदर्शक असतो तर विहीर व कूपनलिकांमधील पाण्यापासून बनवलेला बर्फ अपारदर्शक, पिवळसर असतो, अशी माहिती मढ मच्छिमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष किरण कोळी यांनी दिली. त्यामुळे एखाद्या दुकानात लहान क्युब्जच्या स्वरुपात बर्फ मिळत असेल तर तो स्थानिक पातळीवर केलेला खाण्यायोग्य बर्फ असल्याची खात्री करता येते. मात्र मोठय़ा लादीमधून फोडून काढलेले बर्फाचे कपचे हे बहुधा कारखान्यांमधून आलेल्या बर्फाचेच असतात.
(माहिती साहाय्य – तेजस परब, किशोर कोकणे, संतोष सावंत)

काही मोठय़ा बर्फाच्या फॅक्टरी
* तळोजा – गुप्ता आईस फॅक्टरी (खाण्याजोगा बर्फ), इम्तियाज मरिन प्रा. लि. (साठवणुकीचा बर्फ), माहुल आइस फॅक्टरी (मासे टिकवण्यासाठीचा बर्फ), नासा इंडस्ट्रीज (साठवणुकीचा बर्फ)
* चेंबूर-तुर्भे – आइस लिंक आणि चिराग (आइस क्युब)
* उत्तन – उत्तन मच्छिमार वाहतूक सोसायटीचा छोटेखानी बर्फ कारखाना (दिवसाला साधारण २० टन बर्फाची निर्मिती)

बर्फाच्या किंमती
* खाण्याचा बर्फ – २५०० रुपये प्रति टन
* साठवणुकीसाठीचा बर्फ – १००० रुपये प्रति टन
* या किंमती घाऊक असून वितरकांकडून दुकानदारांपर्यंत येताना किंमतीत वाढ होते.

पालिकेची कारवाई
खाद्य व पेयपदार्थ विक्रेत्यांकडील बर्फाच्या ९२ टक्के नमुन्यांमध्ये ई कोलाय जीवाणू आढळला आहे. पालिकेच्या आरोग्य खात्याने केलेल्या या तपासणीत फेरीवाल्यांकडील पाण्याच्या २६ टक्के नमुन्यांमध्येही इ कोलाय सापडला आहे. १ ते ३१ मे दरम्यान शहरभर पसरलेले बर्फ विक्रेते, उपाहारगृह, ज्यूस सेंटर, उसाचा रस विक्रेते, डेअरी, मिठाईची दुकाने, बर्फाचे गोळे विक्रेते, लस्सी व ताक विक्रेते, फास्ट फूड सेंटर अशा सर्व विक्रेत्यांकडील बर्फाचे ९४८ नमुने गोळा करण्यात आले. त्यातील ९२ टक्के म्हणजे ८७० नमुन्यांमध्ये इ कोलाय जीवाणू आढळले.