मुंबई : अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या आयआयटी मुंबई येथे आता मानव्य विज्ञान आणि आरोग्य विज्ञान विषयांचे, चित्रपटनिर्मिती हे अभ्यासक्रमही सुरू होणार आहेत. अभियांत्रिकीबरोबरच इतर विद्याशाखांतील शिक्षणही विद्यार्थ्यांना घेता यावे यासाठी काही नवे विषयही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

उत्तम अभियंता होण्याची मनीषा बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आयआयटीमधील प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येते. अभियांत्रिकी, रचना (डिझाइन), व्यवस्थापन या शाखांतील शिक्षणामध्ये ठसा उमटवलेले आयआयटी मुंबई आता आरोग्य विज्ञान आणि मानव्य विज्ञान शाखांतील अभ्यासक्रमही सुरू करणार आहे. संस्थेला ‘इन्स्टिटय़ूट ऑफ एमिनन्स’चा दर्जा मिळाल्याचे औचित्य साधून संस्थेचे संचालक डॉ. देवांग खक्कर यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी आयआयटी मुंबईच्या पुढील दहा वर्षांचा विकास आराखडा या वेळी मांडण्यात आला. संस्थेला मिळालेल्या विशेष दर्जामुळे २०० कोटी रुपये प्रतिवर्षी असा पाच वर्षांसाठी १ हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.

पुढील शैक्षणिक वर्षांपासून गणित, जीवशास्त्र, अर्थ सायन्स या विषयांचे पदवी स्तरावरील अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर राज्यशास्त्र, इतिहास, औद्योगिक कायदे, माहिती विज्ञान, चित्रपटनिर्मिती या विषयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. आरोग्य विज्ञान क्षेत्राशी संबंधित विविध विषयांचे अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहेत. आयआयटी आणि एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयात सामाईकपणे हे अभ्यासक्रम होतील. विद्यार्थ्यांना एम.डी. किंवा पीएच.डी.ची पदवी मिळवता येईल. या अभ्यासक्रमांबाबत रुग्णालयांशी चर्चा सुरू असल्याचे डॉ. खक्कर यांनी सांगितले. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी १२ हजार क्षमतेचे नवे वसतिगृह बांधणे, काही इमारतींचे नूतनीकरण अशा प्रकल्पांची आखणीही करण्यात आली आहे.

‘संस्थेला मिळालेल्या विशेष दर्जाच्या निमित्ताने आम्हाला एक चांगली संधी मिळाली आहे. त्याला आम्ही न्याय देऊ असा विश्वास वाटतो. संशोधन, नव्या अभ्यासक्रमांची निर्मिती करणे यावर अधिक भर देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक समाजाभिमुख, बाजारपेठेच्या गरजांनुसार करण्याच्या दृष्टीने आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल,’ असे डॉ. खक्कर या वेळी म्हणाले.