मंत्रालयात आता ‘आपले सरकार’ असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असला तरी उच्चपदस्थ, राजकीय नेते, आलिशान गाडय़ांमधून येणारे ‘व्हीआयपी’ यांना मुक्त प्रवेश आहे, तर सर्वसामान्य जनतेला मात्र बराच वेळ पासासाठी मंत्रालयादारी तिष्ठत ठेवून सुरक्षेच्या जाचक त्रासालाही तोंड द्यावे लागत आहे. मंत्रालयाची प्रवेशद्वारे गाडय़ांमधून येणाऱ्यांना खुली असून सर्वसामान्य जनतेला मात्र प्रवेशासाठी अडचणी आहेत.
मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्था गेल्या काही दिवसांपासून अधिक कडक करण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वार, आकाशवाणी दिशेचे प्रवेशद्वार येथून उच्चपदस्थांच्या गाडय़ांबरोबरच शासकीय अधिकारी, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आदींना अनेक वर्षे प्रवेश दिला जात होता. आता तेथून केवळ गाडय़ांनाच प्रवेश आहे. बगिचा दरवाजातून आणि आकाशवाणी प्रवेशद्वाराच्या लगत करण्यात आलेल्या छोटय़ाशा चौकीतून झडतीसह वैयक्तिक तपासणीनंतर प्रवेश देण्यात येत आहे. प्रवेशपत्र मिळविण्यासाठी बराच काळ उन्हातान्हात रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यानंतर या प्रवेशद्वारात, विस्तार इमारतीच्या प्रवेशद्वारात असे दोन-तीनदा सुरक्षा तपासण्यांना तोंड द्यावे लागत आहे आणि पोलीस उर्मटपणेही वागवत आहेत. कॅमेरे नेता येत नाहीत, तर लॅपटॉप नेण्यासही अडथळे आणले जातात. मुख्य इमारतीच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या बाजूच्या प्रवेशद्वारातूनही अनेकदा पोलीस सर्वसामान्यांना आत सोडत नाहीत व दुसऱ्या दरवाजाकडे पाठवितात. मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांसाठी बराच वेळ लिफ्टही अडवून ठेवल्या जातात. ते नसतानाही अनेकदा सर्वसामान्यांना त्यामधून जाण्यास मज्जाव केला जातो. बिल्डर, उद्योजक किंवा उच्चपदस्थांनी सूचना दिल्यानंतर आलेल्या व्यक्ती, आमदार-खासदार आदी कोणीही गाडय़ांमधून आल्यावर त्यांच्यासोबत येणाऱ्या पाच-सात व्यक्तींनाही कोणतेही प्रवेशपत्र न काढता आणि सुरक्षा तपासणीला तोंड द्यावे न लागता प्रवेश मिळतो. मुख्यमंत्री कार्यालयाच्या जनसंपर्क विभागातून सूचना देण्यात येऊनही काही वेळा पत्रकार, खासगी वाहिन्यांचे बातमीदार, कॅमेरामन यांना प्रवेशात अडथळे येतात. केवळ गाडय़ांसाठी ठेवलेल्या प्रवेशद्वारातून ओळखपत्रे तपासून किंवा सामानाची तपासणी करुन अधिकारी, पत्रकार व अन्य लोकांनाही सोडता येऊ शकते; पण गृहखात्याच्या वरिष्ठांचे आदेश असल्याने आमची अडचण असल्याची भावना प्रवेशद्वारातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बोलून दाखविली.