“नारायण राणे मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न गेली २२ वर्षं बघत आहेत. परंतु फासा काही फिरवता आला नाही आणि मुख्यमंत्री होता आले नाही. आता त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस आले आहेत. त्यांनाही मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत आहेत. मात्र ‘मी पुन्हा येईन’ म्हणणार्‍या फडणवीसांच्या स्वप्नाला अजून २५ वर्ष लागतील.” असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये जाहीर भाषणामध्ये शिडीशिवाय आम्ही फासे पलटवू आणि हे फासे खूप मोठे असतील, असं म्हणत राज्य सरकारबद्दल भाष्य केलं होतं. त्यावर आता राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

“आम्ही फासे फिरवणार आहोत असे भाजपा नेते सांगत आहेत, कुठले फासे फिरवणार आहेत हे आम्हाला माहीत नाही.” असाही उपरोधिक टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.

“असे अंदाज व्यक्त करण्यापलीकडे फडणवीसांच्या हातात काही नाही”

तसेच, “गेले २२ वर्ष नारायण राणे मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न बघत आहेत. परंतु फासा काही फिरवता आला नाही आणि मुख्यमंत्री होता आले नाही. आता त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस आले आहेत त्यांनाही मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत आहेत. स्वप्न पाहणे हा त्यांचा अधिकार आहे. आणि फडणवीस यांचे ‘मी पुन्हा येईन’ ची स्वप्ने पूर्ण होणार नाही. कारण, उध्दव ठाकरे यांनी सरकार बनवताना सांगितले होते की सरकार पाच वर्षे नाही तर हे सरकार २५ वर्ष टिकणार आहे आणि तेच घडणार.” असेही नवाब मलिक यांनी यावेळी बोलून दाखवले.