11 December 2018

News Flash

विरोधकांना धक्का देण्याची रणनीती

पोटनिवडणुकीत विरोधकांना दणका देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची योजना

विधान परिषद प्रतिनिधिक छायाचित्र

विधान परिषद निवडणुकीत प्रसाद लाड यांना २०० पेक्षा जास्त मतांचे मुख्यमंत्र्यांचे नियोजन

विधान परिषदेच्या एका जागेसाठी येत्या गुरुवारी होणाऱ्या पोटनिवडणुकीत विरोधकांना दणका देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची योजना असून, भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांना २०० पेक्षा जास्त मते मिळतील या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ नसतानाही ही जागा लढविण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. भाजप १२२ आणि शिवसेना ६३ अशी एकत्रित १८५ मते आहेत. याशिवाय सात अपक्ष आणि छोटय़ा पक्षांसह भाजपकडे १९५ पेक्षा जास्त आमदारांचे संख्याबळ आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मानणारे दोन आमदार पाठिंबा देणार आहेत. राणे यांनी तशी घोषणाच केली आहे. पुरेसे संख्याबळ असतानाही विरोधकांची आणखी काही मते मिळतील, असा भाजप नेत्यांना विश्वास आहे.

गेल्या जुलै महिन्यात झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना राज्य विधानसभेत २०८ आमदारांची मते मिळाली होती. एवढीच किंवा यापेक्षा जास्त मते मिळावीत, अशी भाजपचा प्रयत्न आहे. या दृष्टीने मुख्यमंत्री फडणवीस हे स्वत: प्रयत्न करीत असल्याचे भाजपच्या वर्तुळातून सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षातील काही आमदारांशी या संदर्भात चर्चाही केल्याचे समजते. राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेसच्या मीरा कुमार यांना ७७ मते मिळाली होती. विरोधकांचे संख्याबळ ८३ असतानाही तेवढी मते मिळाली नव्हती. यंदा विरोधकांची आणखी मते फोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

भाजप आणि शिवसेनेतील काही असंतुष्ट आमदार गळाला लागतील, असे काँग्रेस नेत्यांचे गणित आहे. यासाठी काही आमदारांशी संपर्क झाल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात येते.

यापूर्वी २००८ मध्ये एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधकांची मते मोठय़ा प्रमाणात फुटली होती. काँग्रेसच्या मधू जैन तेव्हा अवघ्या सहा मतांनी विजयी झाल्या होत्या. गुरुवारी होणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील आमदारांवर भाजपचा डोळा आहे. काही आमदारांना पुढील निवडणुकीत भाजपचे वेध लागले आहेत. अशा आमदारांची मते भाजपला मिळण्याची शक्यता आहे.

संख्याबळ

भाजप  १२२

शिवसेना ६३

काँग्रेस  ४२

राष्ट्रवादी ४१

शेकाप  ३

बहुजन विकास

आघाडी  ३

अपक्ष   ७

एमआयएम     २

भारिप बहुजन महासंघ    १

मनसे   १

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट    १

समाजवादी पार्टी  १

राष्ट्रीय समाज पक्ष      १

First Published on December 4, 2017 3:45 am

Web Title: fadnavis planning more than 200 votes for lad in legislative council elections