कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडून किरीट सोमय्या यांना नोटीस पाठवण्यात आली असून, ज्यामध्ये तुम्ही जिल्ह्यात येऊ नये असे सोमय्यांना सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या घराबाहेर मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तर सोमय्यांवरील या स्थानबद्धतेच्या कारवाईबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“माजी खासदार किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकारविरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील.” असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

तसेच, ”महाविकास आघाडीच्या राज्यात महाराष्ट्रात हे चालले तरी काय?, ज्या व्यक्तीने ‘पोलिस ठाण्यात तक्रार करतो आहे’, हे आधी जाहीर केले, त्यांनाच पोलिस स्थानबद्ध करीत आहेत. लोकशाही अस्तित्वात आहे का?” असं देखील फडणवीस म्हणाले आहेत.

किरीट सोमय्या यांच्या घराबाहेर पोलिसांचा फौजफाटा; कोल्हापूर जिल्ह्यात न येण्याचे आदेश

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील कागदपत्रे बुधवारी नवी दिल्लीत प्राप्तिकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या उच्चपदस्थांकडे सोपविली होती. दोन-चार आठवड्यांत याबाबत कार्यवाही अपेक्षित आहे आणि आता विदर्भातील एका मंत्र्याचा गैरव्यवहार बाहेर काढणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले होते. तर, आता कोल्हापूर दौरा थांबवण्यासाठी सरकारची ही दडपशाही असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. हसन मुश्रीफांचे घोटाळे दाबण्यासाठी हा माझ्यावर दबाव आहे, असं ते म्हणाले आहेत.

“किरीट सोमय्या यांच्या बंगल्यासमोर पोलीस बंदोबस्त ठेवायला ते दहशतवादी आहेत का?”; चंद्रकांत पाटील यांचा सवाल!

“किरीट सोमय्या यांच्या बंगल्यासमोर पोलीस बंदोबस्त ठेवायला ते दहशतवादी आहेत का? भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा महाविकास आघाडी सरकारला सवाल. महाविकास आघाडीच्या दडपशाही, गुंड प्रवृत्तीला भाजपा घाबरणार नाही. भाजपा किरीट सोमय्या यांच्या पाठीशी आहे.” असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fadnavis reacted to the localization action against kiroti somaiya saying msr
First published on: 19-09-2021 at 18:48 IST