मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आज गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. यानंतर भाजपाकडून सातत्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी मागणी केली जात होती. अखेर आज अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर माध्यामांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली. खरं तर राजीनामा देण्यासाठी उशीरच झाला, असं देखील फडणवीस यांनी म्हटलेलं आहे.

मोठी बातमी! अनिल देशमुख यांनी दिला गृहमंत्रीपदाचा राजीनामा

फडणवीस म्हणाले, “न्यायालयाच्या निर्णयानंतर हे अपेक्षितच होतं की राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. तशाप्रकारचा राजीनामा गृहमंत्र्यांनी दिल्याचं माध्यामांद्वारे समोर आलं आहे. खरं म्हणजे मला असं वाटतं की हा राजीनामा देण्यासाठी उशीर झाला. आमची अपेक्षा अशी होती, की इतके गंभीर आरोप लागल्यानंतर आणि रश्मी शुक्लांचा रिपोर्ट बाहेर आल्यानंतर तत्काळ अनिल देशमुख यांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व शरद पवार यांनी घ्यायला हवा होता. परंतु आता त्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी लागली.”

अनिल देशमुखांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया

तसेच, “हा राजीनामा जरी झाला असला तरी अजुनही एका गोष्टींचं कोडं मला पडलेलं आहे की इतक्या भयावह घटना, महाराष्ट्रात झाल्या. कधी नव्हे अशा प्रकारचे आरोप हे मंत्र्यांपासून ते पोलिसांपर्यंत त्या ठिकाणी लागले. पण राज्याचे मुख्यमंत्री या संदर्भात एक शब्द देखील का बोलत नाहीत? अद्यापही त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया का दिली नाही? या संपूर्ण प्रकरणात त्याचं मौन हे मात्र अस्वस्थ करणारं आहे. म्हणून मला असं वाटतं की, किमान अशा परिस्थितीत तरी, त्यांची प्रतिक्रिया ही यायला हवी होती. त्यांची शेवटची प्रतिक्रिया जी मला आठवते, ती वाझे काय लादेन आहे का? या प्रतिक्रियेनंतर एवढ्या गोष्टी घडल्या तो लादेन आहे की दाउद आहे, हे मला माहिती नाही. पण तो नेमका काय आहे हे समोर आल्यानंतर आणि या सर्व घडामोडीनंतरही मुख्यमंत्री का बोलत नाहीत? हा माझा सवाल आहे.” असं देखील यावेळी फडणवीस यांनी बोलून दाखवलं.

“शेवटी राज्याचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात आणि जेव्हा परिस्थिती अडचणीची असते, तेव्हा त्या परिस्थितीला सामोरं जाऊन मुख्यमंत्र्यांनी लोकांना आश्वस्त करायचं असतं, की ठीक आहे चूक झाली असेल पण आम्ही ती सुधारू किंवा आमचं यावर असं म्हणणं आहे. अशा गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून समोर आल्या पाहिजे, पण तशा आलेल्या दिसत नाहीत.” असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.