पवई येथे मंगळवारी अमेरिकी नागरिक डेव्हिड पॅरीश यांच्यावरील हल्ला हा एक बनाव असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस तपासामध्ये हल्ला झालाच नसल्याचे समोर आले आहे. मात्र हल्ल्याचे कारण देत डेव्हिड अमेरिकेला रवाना झाले.
अमेरिकन नागरिक डेव्हिड पॅरीश (५२) हे एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतात. कंपनीच्या कामासाठी ते मुंबईत आले होते. पवईच्या ‘हॉटेल रमादा’ मध्ये ते उतरले होते. मंगळवारी सकाळी जॉगिंग साठी बाहेर गेले असता तीन हल्लेखोरांनी आपल्यावर हल्ला केल्याचे डेव्हिड यांनी सांगितले. तीन अज्ञात इसम मोटारसायकलीवर आले आणि आपल्याकडील बॅग खेचण्याचा प्रयत्न केला. मी मुष्टियोद्धा असल्याने त्यांना पिटाळून लावले, असे डेव्हिड यांनी पोलिसांना सांगितले होते.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना मात्र धक्कादायक वास्तव समोर आले. पोलिसांनी हल्ल्याच्या वेळची घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यावेळी काहीच दिसून आले नाही. जी वेळ त्यांनी सांगितले होती त्यावेळी ते व्यायमशाळेत होते. तसेच जेव्हा हल्ल्याच्या वेळी अंगावर एक शर्ट होता तर पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले तेव्हा दुसरा शर्ट होता. यावरून पोलिसांना डेव्हिड यांचाच संशय आला. त्यांचीच उलट चौकशी केल्यावर आपणच हा बनाव रचल्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
कंपनीच्या कामासाठी डेव्हिड मुंबईत आले होते. कंपनीने मुंबईत राहण्याचा कालावधी वाढवून घेतला होता. परंतु डेव्हिड यांना मुंबईत राहयचे नव्हते. त्यामुळे त्यांनी हल्ल्याचा बनाव करून अमेरिकेत तात्काळ रवाना झाले. मात्र, पोलिसांनी याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही.