वैद्यकीय प्रवेशांसाठी बनावट जात प्रमाणपत्र सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याच्या आदल्या दिवशीच आरोपी असलेले नऊ विद्यार्थी फरार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सर्व विद्यार्थी भायखळ्याच्या जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील आहेत. १० ऑगस्टच्या रात्री जे. जे.च्या प्रशासनाने जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात या विद्यार्थ्यांविरोधात फसवणुकीची तक्रार नोंदविली. मात्र त्या आधीच विद्यार्थ्यांनी पोबारा केला होता. दरम्यान, विद्यार्थ्यांना बनावट जात व जात वैधता प्रमाणपत्रे बनवून देण्यापासून ते केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दाखल होईपर्यंतच्या विविध टप्प्यांवर काम करणारी टोळी असावी, असा पोलिसांचा संशय आहे.

राज्यभरातील अनेक नामांकित वैद्यकीय व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयांत बनावट जात प्रमाणपत्रे देऊन कसे प्रवेश मिळविले जात आहेत, यावर ‘लोकसत्ता’ गेली अनेक दिवस वृत्ताद्वारे प्रकाश टाकत आहे. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) १९ विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची खातरजमा करून वैद्यकीय महाविद्यालयांना विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या. यापैकी नऊ विद्यार्थी जे. जे. महाविद्यालयाची आहेत. या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अनुसूचित जमातीच्या (एसटी) जात प्रमाणपत्रांवर नंदूरबार जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समितीचे खोटे सही-शिक्के आहेत.

प्रशासनाने बुधवारी (१० ऑगस्ट) सायंकाळी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. आरोपी नऊ विद्यार्थी एमबीबीएसला २०१२-१३ ते २०१४-१५ या वेगवेगळ्या शैक्षणिक वर्षांत शिकणारे आहेत. पण, महाविद्यालयातर्फे तक्रार दाखल होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे ९ ऑगस्टलाच हे विद्यार्थी महाविद्यालय- वसतिगृहातून परागंदा झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. महाविद्यालय प्रशासानतर्फे सुरू असलेल्या चौकशीची कुणकुण लागल्याने विद्यार्थी फराप्रशासनाने बुधवारी (१० ऑगस्ट) सायंकाळी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. र झाले की, त्यांना पळून जाण्यास मदत करण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

तक्रार दाखल केल्यानंतर त्यांचा शोध घेतला असता, आरोपी विद्यार्थी फरार झाल्याचे आमच्या लक्षात आले, त्यांचा माग काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास मुंबई पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला. सर्व आरोपी विद्यार्थ्यांनी एकाच ठिकाणाहून जात प्रमाणपत्र कसे काय मिळवले, या विद्यार्थ्यांना तिथूनच प्रमाणपत्र काढून घेण्याविषयी कुणी सांगितले, यासर्व पैलूंचा तपास करणे आवश्यक असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने अधोरेखित केले.

विशेष म्हणजे, ही कागदपत्रे महाविद्यालय प्रशासनाकडे जमा केल्यानंतर त्याची कोणत्याच प्रकारे पडताळणी झाली नाही. मागासवर्गीय प्रवर्गात प्रवेश मिळवून देण्यासाठी विद्यार्थी-पालकांना गाठणारी टोळी प्रवेशकाळात कार्यरत असते का, याचाही शोध पोलीस घेणार आहेत.