४.८० लाखांच्या बनावट नोटांसह पश्चिम बंगालमधील दोन तरूण अटकेत

गुन्हे शाखेने डोंगरी येथून दोन तरूणांना अटक करुन त्यांच्याकडील तब्बल चार लाख ८० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. उच्च दर्जाचा कागद, हुबेहूब छपाई आणि प. बंगालमधून पुरवठा या समीकरणामुळे सीमेपलिकडे बनावट नोटांचे छापखाने सुरू झाले की काय अशी भीती व्यक्त होत आहे.

पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातून मुंबईत आलेल्या सुलेमान शेख आणि सनाउल शेख यांना खंडणी विरोधी पथकाने डोंगरी परिसरातून अटक केली. झाडाझडतीत त्यांच्याकडून दोन हजार रुपयांच्या २४० नोटा सापडल्या. उत्कृष्ट छपाईमुळे या नोटा खऱ्या की खोटय़ा हे सुरुवातीला समजत नव्हते. मात्र या नोटांवर एकच अनुक्रमांक असल्याने त्या बनावट असल्याची खात्री पटली, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त दिलीप सावंत यांनी दिली.

मालदा येथील एका व्यक्तीने या नोटा देऊन त्या मुंबईत चलनात आणण्यास सांगितले होते. याबदल्यात या दोघांना कमिशन मिळणार होते, अशी माहिती अटक केलेल्या आरोपींनी चौकशीत दिली. हे दोघे याआधी मुंबईत बिगारी काम, मासे विक्रीचा व्यवसाय करत. या दोघांकडून खंडणीविरोधी पथक कसून चौकशी करत आहे.

दरम्यान, निश्चलनीकरणानंतर पाचशे किंवा दोन हजारच्या नोटांची रंगीत छायांकित प्रत काढून चलनात आणण्याचे तुरळक प्रकार घडले होते. मात्र हुबेहूब नोटा हस्तगत होण्याची शहरातील ही पहिलीच वेळ आहे. निश्चलनीकरणाआधी हजार व पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बांग्लादेशमार्गे प. बंगालमध्ये येत. बांगलादेशच्या सीमेवर असलेल्या प. बंगालमधील मालदा, मुर्शिदाबाद, नदीया, २४ परगना या जिल्हयांमध्ये कोटय़वधी रुपयांच्या बनावट नोटा खरेदी-विक्रीचा सुळसुळाट होता. झटपट श्रीमंत होण्यासाठी शंभर रुपयांना पाचशेची तर दोनशे रुपयांना हजारची बनावट नोट मिळते. पाचशेची नोट मुंबईत पोहोचेपर्यंत तिचा भाव दिडशे ते दोनशे रुपयांवर जातो. ही नोट खरी म्हणून चलनात आणल्यास साडेतीनशे रुपयांचा फायदा होतो. हे पाहून उदरनिर्वाहासाठी मुंबईत आलेले बंगालमधील तरूण सर्रास बनावट नोटा चलनात आणतात.