बनावट नोटांची तस्करी करणाऱ्या बंगालमधील सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याची घटना ताजी असतानाच मुंबईत बनावट नोटांची तस्करी सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंधेरी युनिटने या प्रकरणी एकाला अटक करून दोन लाख रुपये किमतीच्या नोटा हस्तगत केल्या आहेत.
वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहत परिसरात एक इसम बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक दीपक फटांगरे यांना मिळाली होती. त्यानुसार सुनील माने, ज्योत्स्ना रासम, राजू कसबे, संजय मोरे आदी अधिकाऱ्यांनी सापळा रचून मोहम्मद जहाँगीर लतीफ शेख (३३) याला अटक केली. पश्चिम बंगालमधील मालदा येथील हा इसम असून त्याच्याकडे पाचशे रुपये किमतीच्या ४०० नोटा आढळून आल्या. त्याविरुद्ध खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  
मुंबईत बनावट नोटांचे वितरण सहज शक्य आहे आणि अंधेरी पूर्वेतील एका दुकानातून कपडे खरेदी करताना बनावट नोटा वापरण्यात आल्याचेही शेखने सांगितले आहे. सदर बनावट चलन संबंधित दुकानातून ताब्यात घेण्यात आले आहे. सहआयुक्त सदानंद दाते आणि अतिरिक्त आयुक्त निकेत कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.