कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे ७७ लाख २६ हजार अर्ज

विविध कार्यकारी सोसायटी व काही सहकारी बँकांनी शेतकऱ्यांच्या नावे दाखविलेल्या सुमारे १२-१५ लाख बनावट खात्यांचा छडा कर्जमाफी योजनेमुळे लागण्याचा दावा मंत्री व उच्चपदस्थांनी केला असला तरी तो फसण्याची शक्यता आहे. राज्यातील सुमारे ८९ लाख कर्जदार शेतकऱ्यांपैकी ७७ लाख कर्जदार शेतकऱ्यांनी कर्जमाफी व प्रोत्साहन योजनेसाठी अर्ज केले आहेत. योजनेसाठीच्या निकषांमुळे १० ते १२ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले नसावेत, असा अंदाज आहे. उर्वरित सर्वच कर्जदार शेतकऱ्यांचे अर्ज आले असल्याने बँका किंवा विविध कार्यकारी सोसायटय़ांवर कसे खापर फोडणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्यातील ८९ लाख कर्जदार शेतकऱ्यांपैकी सुमारे ४४ लाख शेतकरी थकबाकीदार असून ३५ लाख नियमित कर्ज भरत आहेत. तर कर्जाचे पुनर्गठन झालेल्या सुमारे १० लाख कर्जदार शेतकऱ्यांनाही कर्जमाफी दिली जाणार आहे. सध्या सहकार विभागाच्या सुमारे साडेतीन हजार लेखापरीक्षकांनी प्रत्येक जिल्हा बँकेतील कर्जखात्यांची माहिती व योजनेसाठी आलेल्या अर्जाची माहिती यांची छाननी सुरू केली आहे. पण निर्माण झालेल्या आकडेवारीच्या गोंधळामुळे  आता बँकांकडून एकूण कर्जदार आणि त्यापैकी थकबाकीदार व नियमित कर्ज भरणारे असा तपशील मागवून घेऊन आलेल्या अर्जदार शेतकऱ्यांच्या माहितीशी ते ताडून पाहिले जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. विविध कार्यकारी सोसायटय़ा व जिल्हा सहकारी बँकांनी शेतकऱ्यांच्या नावे दाखविलेल्या १२-१५ लाख बोगस खात्यांचा छडा लागेल, सरकारची वर्षांनुवर्षे होत असलेली फसवणूक बंद होईल, असे दावे उच्चपदस्थांकडून करण्यात येत होते.

सरकारचा अंदाज

कर्जमाफीसाठी कुटुंबाला दीड लाख रुपयांची मर्यादा आहे. या योजनेसाठी ८९ लाखांपैकी जास्तीत जास्त ६५ लाख शेतकरी कर्ज खातेदारांचे अर्ज येतील, १०-१२ लाख शेतकरी निकषांमुळे अर्ज करणार नाहीत, असा सरकारचा अंदाज होता.

शेतकऱ्यांना तातडीने आधारघेण्याची सूचना

आधार क्रमांक नसलेल्या दोन लाख ४१ हजार ६२८ शेतकऱ्यांनी योजनेसाठी अर्ज केले असून त्यांनी तातडीने आधार क्रमांक घ्यावा, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. त्यासाठी या शेतकऱ्यांना अर्जदुरुस्तीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.