कागदपत्रांवर अ‍ॅन्टॉप हिलच्या झोपडपट्टीतील पत्ता

खोटे पॅन, आधार, वाहनचालक परवाना, मतदार ओळखपत्रासह अन्य महत्त्वाची कागदपत्रे बनवून विकणाऱ्या टोळीचा ग्राहकवर्ग हातावर पोट असलेला परप्रांतीय आणि घुसखोर बांग्लादेशी असावा, असा दाट संशय गुन्हे शाखेला आहे. आजवर तपासात या टोळीने बहुतांश बनावट कागदपत्रांवर अ‍ॅन्टॉपहिलच्या झोपडपट्टय़ांचा पत्ता नोंदवल्याची माहिती पुढे आली आहे.

शुक्रवारी गुन्हे शाखेच्या सातरस्ता कक्षाने मशीद बंदर परिसरातील एका दुकानात छापा घालून सुनील चौधरी आणि अताउल्ला मलिक या दोघांना अटक केली. गेल्या दोन वर्षांपासून ही दुकली एक हजार ते १० हजार रुपये स्वीकारून बनावट कागदपत्रे विकते, अशी माहिती पथकाला मिळाली. पथकाने छापा घातला तेव्हा दुकानातून असंख्य कोरी आधार, मतदार ओळखपत्रे दुकानात आढळली. याशिवाय कोऱ्या स्मार्ट कार्ड आणि मास्टर कार्डाचा साठाही सापडला. त्यावरून ही दुकली बनावट डेबिट, क्रेडिट कार्डही तयार करते का, या दृष्टिकोनातून पथकाने तपास सुरू केला आहे.

मूळचा बिहारचा रहिवासी असलेला चौधरी या टोळीचा प्रमुख आहे. आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या चौधरीने दोन वर्षांपासून मलिकच्या मदतीने हा अवैध धंदा सुरू केला. दिवसाला तब्बल १५ बनावट कागदपत्रे तो विकत असे. तपासात चौधरीने तयार केलेली बनावट कागदपत्रे हुबेहूब आहेत. याबाबत विचारता, गुगलवर आधार किंवा पॅन कार्ड असे लिहिल्यास सगळीच माहिती मिळते. संकेतस्थळावरून प्रतिकृती ‘स्कॅन’ करून त्यावर ग्राहकाचा फोटो चिकटवून, मनाला येतील तसे तपशील भरून कागदपत्रे विकल्याचे चौधरीने पथकाला सांगितले. चौधरीने काही दलाल नेमले होते. ते ग्राहकांना चौधरीच्या दुकानात आणत. सध्या हे दलाल कारवाई टाळण्यासाठी बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. दलाल सापडल्यास चौधरीच्या ग्राहकवर्गापर्यंत पोहोचणे शक्य होईल, ग्राहकांनी बनावट कागदपत्रांचा वापर कुठे, कसा केला याची माहिती मिळू शकेल, असे पथकाकडून सांगण्यात आले. आजवर तपासात चौधरीच्या ग्राहकवर्गातील काहींचे पत्ते हाती आले आहेत. मात्र ते सर्व अ‍ॅन्टॉप हिलच्या झोपडपट्टय़ांचे आहेत. खातरजमा केली असता हे पत्ते चुकीचे, खोटे असल्याचे स्पष्ट झाले.