ओएलएक्स किंवा तत्सम संकेतस्थळांवरून वापरलेल्या वस्तू विकत घेताना खातरजमा करणे आवश्यक आहे, हे आग्रीपाडा पोलीस हाताळत असलेल्या एका प्रकरणातून स्पष्ट होते. लष्करी अधिकारी असे भासवून ओएलएक्सवरून वापरलेला मोबाइल स्वस्तात विकण्याच्या बहाण्याने तोतयाने दक्षिण मुंबईतील एका व्यापाऱ्याला गंडा घातला. आरोपींचा ठावठिकाणा शोधण्यासाठी आग्रीपाडा पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला, तेव्हा व्यावसायिकाला फसवणारा तोतया आणि त्याचा साथीदार सध्या नागालॅण्ड पोलिसांच्या कोठडीत असल्याचे स्पष्ट झाले. आयफोन विकण्याच्या बहाण्याने या दुकलीने राजस्थानमधील एका महिलेला अशाच पद्धतीने फसवले होते.

नासीर खान यांचा सातरस्ता परिसरात व्यवसाय आहे. नवा मोबाइल घेण्यासाठी ते ओएलएक्स आणि अन्य संकेतस्थळांवरून माहिती घेत होते. तेव्हा त्यांना सॅमसंग एस९ हा काही दिवस वापरलेला मोबाइल ४१ हजार रुपयांना विक्रीला काढल्याची माहिती मिळाली. त्यांनी मोबाइल मालकाशी संकेतस्थळावरून संपर्क साधला. मालकाने नासीर यांना स्वत:चा मोबाइल क्रमांक पाठवला. त्यानुसार दोघांत व्यवहाराची बोलणी सुरू झाली. मी लष्करी अधिकारी असून सध्या जोधपूर येथे नेमणुकीस आहे, असे मोबाइल मालकाने सांगितले. खातरजमेसाठी लष्करातील उपाहारगृहाचे ओळखपत्र, आधार कार्ड आदी कागदपत्रेही नासीर यांना व्हॉट्सअ‍ॅपवरून पाठवली. ती पाहून नासीर यांनी विश्वास ठेवला. ३९ हजार रुपयांना मोबाइलचा व्यवहार ठरला.

२८ जूनला मोबाइल मालकाने तो कुरिअरने पाठवल्याचे नासीर यांना सांगितले. संबंधित कुरिअर चालकाचा मोबाइल क्रमांकही नासीर यांना दिला. पुढे नासीर आणि कुरिअर चालक यांच्यातील संवाद सुरू झाला. तुमच्या नावे कुरिअर आहे, मी अध्र्या तासात पोहोचतो, असे चालक सांगू लागला. अचानक त्याने नासीर यांना फोन करून पैसे अदा न केल्याने तुमचे कुरिअर थांबवण्यात आले आहे, तुम्ही पैसे अदा करा, त्यानंतरच कुरिअर मिळेल, असे सांगितले. त्यानुसार नासीर यांनी मोबाइल मालकाच्या बँक खात्यात १५ हजार रुपये जमा केले. त्यानंतर कुरिअर चालक आणि मोबाइल मालक या दोघांचे मोबाइल बंद येऊ लागले. फसवणूक झाल्याचे कळताच नासीर यांनी आग्रीपाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

वरिष्ठ निरीक्षक सावलाराम आगवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर विभागाचे उपनिरीक्षक संतोष नावलगी यांनी तपास सुरू केला. दोन्ही मोबाइल क्रमांकांवरून आरोपींचा शोध सुरू होता, इतक्यात नागालॅण्ड पोलिसांचा आंतरराज्यीय बिनतारी संदेश महाराष्ट्र पोलिसांना मिळाला. त्या संदेशात साबीर आणि साकिर या बंधूंना अशाचप्रकारे फसवणूक केल्याप्रकरणी राजस्थान येथून अटक केल्याची माहिती होती. तसेच फसवणुकीसाठी लष्करी अधिकारी असल्याची थाप, त्याचे नाव, त्याच्या नावे महिलेला दिलेली ओळखपत्रे आणि नासीर यांना पाठवलेली कागदपत्रे सारखीच आढळली. त्यानुसार नावलगी आणि पथकाने नागालॅण्ड पोलिसांशी संपर्क साधून आग्रीपाडय़ात दोघांविरोधात गुन्हा नोंद असल्याची माहिती कळवली.

लष्करी अधिकारी अस्तित्वात

जी ओळखपत्रे आरोपींनी नासीरला पाठवली होती, त्या नावाचा लष्करी अधिकारी अस्तित्वात आहे. त्या अधिकाऱ्याची कागदपत्रे या दोघांना रस्त्यात सापडली आणि त्याचा वापर ते गुन्ह्य़ांमध्ये करीत होते, अशी माहितीही आग्रीपाडा पोलिसांना मिळाली आहे.