समाजमाध्यमांवरून पसरवल्या जाणाऱ्या खोटय़ा बातम्यांचा खरा ‘पंचनामा’

समाजमाध्यमांतून सातत्याने पसरविल्या जात असलेल्या फेक न्यूज अर्थात खोटय़ा बातम्यांच्या यादीमध्ये या आठवडय़ात आणखी एका नव्या खोटय़ा संदेशाची भर पडली आहे. ही बातमी आहे – डान्स ऑफ द हिलरी नामक ध्वनिचित्रफितीची.

त्यात म्हटले आहे, की – ‘तुमच्या फोनमधील यादीतील सर्व कॉन्टॅक्टस्ना कृपया कळवा, की ‘डान्स ऑफ द हिलरी’ या नावाचा व्हिडीओ उघडून पाहू नका. तो एक व्हायरस आहे. तो तुमचा मोबाइल फॉर्मॅट करतो. सावधान, तो फारच धोकादायक आहे. आजच त्याबद्दलची घोषणा बीबीसी रेडिओवरून करण्यात आली आहे. हा संदेश तुम्हाला जेवढय़ांना पाठविणे शक्य आहे त्या सगळ्यांना पाठवा.’

मुळात या संदेशात आज या व्हायरसची घोषणा बीबीसी रेडिओवरून झाली असे म्हटले असले, तरी तसे अजिबात घडलेले नाही. हा संदेशच मुळी गेल्या वर्षीचा आहे. गतवर्षी जुलै-ऑगस्टमध्ये तो भारतात प्रसारित झाला होता. तेव्हाच तो खोटा असल्याचे सायबर सुरक्षा क्षेत्रातील जाणकारांनी स्पष्ट केले होते. त्या पूर्वी एप्रिल २०१५ मध्ये असाच संदेश अमेरिकेत प्रसृत करण्यात आला होता. त्यातील व्हिडीओचे नाव मात्र वेगळे होते. ते होते ‘डान्स विथ द पोप.’

एकंदर हा संदेश खोटा असून, सध्या रॅन्समवेअर आणि वॉन्ना क्राय या व्हायरसच्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणात आणखी भर घालण्यासाठी हा संदेश पाठविण्यात येत आहे.

आपल्या मित्रांना, नातेवाईकांना तो पाठवून त्या गुन्ह्य़ात आपण सहभागी न होणे एवढेच आपल्या हातात आहे.