कामाच्या त्रयस्थ तपासनीसांना पालिका प्रशासन बाहेरचा रस्ता दाखवणार

रस्त्यांच्या कामांमध्ये दर्जा राखला जातो की नाही यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या त्रयस्थ तपासनीसांनीच खोटे अहवाल दिल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी संबंधित त्रयस्थ तपासनीसांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा विचार पालिका प्रशासन करीत आहे. त्याचबरोबर यापुढे रस्त्यांच्या कामांच्या दर्जा तपासण्यासाठी त्रयस्थ तपासनीसांची नियुक्त न करता हे काम पालिका अधिकाऱ्यांवरच सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नालेसफाईतील गाळ वाहून नेण्यात घोटाळा झाल्याचे उघड झाल्यानंतर दस्तुरखुद्द महापौर स्नेहल आंबेकर यांनी आयुक्त अजय मेहता यांना गोपनीय पत्र पाठवून रस्ते कामातील डेब्रिजची विल्हेवाट लावण्यात होत असलेला भ्रष्टाचार निदर्शनास आणून दिला होता. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी महापौरांनी केली होती. त्यामुळे शिवसेनेत मोठी खळबळ उडाली होती. महापौरांच्या मागणीनुसार आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले होते.

चौकशी समितीने सुमारे ३० रस्त्यांची चौकशी सुरू केली होती. चौकशी समितीने रस्त्याची पाहणी केली. तसेच केलेल्या कामांचे नमुनेही घेतले. रस्त्यासाठी वापरलेल्या साहित्याच्या नमुन्यांमध्ये दोष आढळून आला आहे. रस्त्यांचा दर्जा उत्तम असावा यासाठी कामांवर लक्ष ठेवण्यासाठी त्रयस्थ तपासनीसांची नियुक्ती करण्यात आली होती.रस्त्यांचा दर्जा उत्तम असावा यासाठी कामांवर लक्ष ठेवण्यासाठी त्रयस्थ तपासनीसांची नियुक्ती करण्यात आली होती. या त्रयस्थ तपासनीसांनीच खोटे अहवाल दिल्याचे चौकशीअंती उघड झाले आहे. त्यामुळे या त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा विचार पालिका करीत आहे.

रस्त्याच्या कामांतून सल्लागार हद्दपार

त्रयस्थ तपासनीसांनीच कामाबाबत खोटे अहवाल सादर केल्याचे निदर्शनास आल्यामुळे प्रशासनाच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. त्यामुळे यापुढे रस्ते कामांसाठी त्रयस्थ तपासनीसांची नियुक्ती करायची नाही, असा ठोस निर्णयच घेण्यात आला आहे. रस्त्यांच्या कामांचा दर्जा उत्तम असावा हे पाहण्याची जबाबदारी पालिका अधिकाऱ्यांवरच सोपविण्यात येणार आहे.

भविष्यात रस्ते कामात कुचराई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले. नालेसफाईतील घोटाळ्यानंतर आता रस्ते कामांतील भ्रष्टाचार उघडकीस आल्याने सत्ताधारी शिवसेना अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.