02 March 2021

News Flash

‘वाडा कोलम’ वाचवण्याची हाक

परराज्यातील बनावट तांदळाचा बाजारपेठेवर कब्जा

|| नीरज राऊत/रमेश पाटील

परराज्यातील बनावट तांदळाचा बाजारपेठेवर कब्जा

वाडा येथील प्रसिद्ध कोलम तांदळाच्या नावाखाली आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांत तयार होणारा त्यासारखाच दिसणारा बोगस तांदूळ मुंबईपासून ते थेट अमेरिकेपर्यंतच्या बाजारांत सर्रास विकला जात आहे. या नकली मालाच्या स्पर्धेमुळे अस्सल वाडा कोलमला अपेक्षित दर तर मिळत नाहीच, पण ही जातच संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. ग्राहकांची मोठय़ा प्रमाणात होणारी फसवणूक टाळण्यासाठी तसेच तांदळाची ही प्रसिद्ध जात टिकवण्यासाठी शासनाचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. अशा वेळी वाडा कोलम ही जात टिकवण्यासाठी तिचे भौगोलिक मानांकन (जी.आय.) करणे हा एकमेव पर्याय असून तसे प्रयत्न कृषी विभागाने सुरू केले आहेत.

बारीक दाणा, सुगंधित, चविष्ट, कसदार-पौष्टिक असलेल्या कोलम जातीची लागवड वाडा परिसरात सुमारे ५० वर्षांपासून होत आहे. यामध्ये पूर्वी पनवेल (जाडा), सुरती कोलम आणि झिणी या प्रजातीच्या कोलमची लागवड होत असे. १२५ दिवसांच्या झिणी आणि १३० ते १३५ दिवसांच्या सुरती कोलम या दोन जातींना १९८०च्या सुमारास ‘वाडा कोलम’ म्हणून संबोधले जाऊ  लागले. हा तांदूळ शिजवल्यानंतर नरम, मुलायम व एक विशिष्ट चवीचा असतो. त्यापासून होणाऱ्या मऊ  भातावर वरण किंवा कालवण टाकल्यास ते पूर्णपणे भातामध्ये शोषले जाते. यामुळे या बारीक दाणेदार भाताला सर्वत्र मागणी वाढली आहे.

वाडा आणि विक्रमगड या दोन तालुक्यांत सुमारे २२ हजार हेक्टरवर भाताची लागवड होते. वाडय़ामध्ये साडेचार हजार क्विंटल तर विक्रमगडमध्ये सुमारे अडीच हजार क्विंटल इतक्या विविध भाताचे बियाणाची लागवड होत आहे. वाडय़ामधून जेमतेम दोन हजार क्विंटल इतका झिणी पद्धतीचा वाडा कोलम उत्पादित होत असून बाजारामधील स्पर्धात्मक वातावरणात या जातीचा टिकाव लागताना दिसत नाही. शहरी भागात राहणारे दर्दी व खवय्ये मंडळी व पंचतारांकित हॉटेलमध्ये विक्री करणारे व्यापारी वाडय़ातील राईस मिलमध्ये येऊन किंवा थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधून वाडा कोलमची खरेदी करताना दिसतात. वाडय़ातील अनेक शेतकरी झिणी व्यतिरिक्त वाय.एस.आर, दप्तरी, गुजरात- ४/११/१७ अशा इतर जातींच्या भाताची लागवड करीत असून त्यांचीही आता वाडा कोलम संबोधून विक्री केली जात आहे. काही व्यापारी इतर राज्यातील तांदूळ आणून त्याला वाडा कोलम म्हणून पॅकिंग करत असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणं जया, रत्न, मसुरी, सुवर्णा, कर्जत या स्थानिक भाताच्या जातींना वाडय़ातील विशिष्ट वातावरणात चांगले उत्पादन मिळताना दिसत आहे. या भागातील उत्पादन खर्चातील सुमारे ६५ टक्के खर्च मजुरीवर होत असून भाताची उत्पादकता वाढवणे, यांत्रिकीकरण हाच पर्याय येथील शेतकऱ्यांसमोर राहिला आहे.

सध्या वाडा कोलम जातीच्या भाताची लागवड मागे पडली असल्याने येथील शेतकरी स्वत:पुरता आपल्या मोजक्या मित्रपरिवारासाठी कोलम जातीची लागवड करताना दिसत आहे. देवळी येथील वाडा कोलम उत्पादक शेतकरी व विक्रेता हरिभाऊ  पाटील म्हणाले की, ‘वाडा कोलम’लासुद्धा जीआय टॅग मिळावा. यामुळे इतर ठिकाणी उत्पादित होणाऱ्या कोलमला ‘वाडा कोलम’ संबोधता येणार नाही. ग्राहकांची फसवणूकही होणार नाही.

वाडा तालुक्याव्यतिरिक्त ठाणे, पालघर जिल्ह्य़ातील इतर तालुक्यांसह हरियाणा, गुजरात, चंद्रपूर, भंडारा या ठिकाणीही वाडा कोलमसारखेच दिसणाऱ्या इतर वाणाचे तांदूळ पिकवून मुंबईसह अन्य बाजारात ‘वाडा कोलम’च्या नावाने विकले जात आहेत.

किंमत जास्त का?

वाडा व विक्रमगड तालुक्याच्या परिसरातील सुपीक जमिनीमध्ये कमी आद्र्रता असलेले कोरडे हवामान व सभोवतालच्या डोंगरामुळे निर्माण झालेल्या विशिष्ट परिस्थितीमध्ये कोलम जातीच्या तांदळाची चांगल्या प्रकारे वाढ होते. सेंद्रिय खतयुक्त जमिनीमुळे पिकाला भात (लोंग) लागल्यानंतर पीक झुकते व जमिनीतील ओलाव्यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. हे टाळण्यासाठी काही शेतकरी गणपतीच्या सुमारास या भात पिकाची पुनर्लागवड करत असत. तरी देखील तांदळाच्या दाण्याच्या वजनामुळे या पिकाचे नुकसान होते. इतर संकरित बियाणापासून एकरी २२ ते २५ क्विंटल तांदळाचे उत्पन्न होत असताना वाडा कोलम जेमतेम पाच ते सहा क्विंटल इतकेच उत्पन्न देतो. त्यामुळे वाढत्या महागाईसोबत या तांदळाची किंमत वाढत गेली.

अस्तित्व धोक्यात का?

आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये भात पिकाच्या उत्पादनासाठी क्विंटलमागे सुमारे ९०० रुपये खर्च येतो. वाडा भागातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे मजुरीचे दर गगनाला भिडले असून वाडय़ामध्ये कोलमच्या उत्पादनासाठी क्विंटलमागे सतराशे ते अठराशे रुपये इतका खर्च सध्या येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या भागातील अनेक शेतकऱ्यांनी सुरती कोलम ही वाडा कोलमची जात कमी उत्पादकतेमुळे लावणे बंद केले असून मोजके शेतकरी झिणी जातीची लागवड करत आहेत. झिणी भाताच्या एका क्विंटलमधून जेमतेम ३० किलो तांदूळ मिळत असून त्याला वाडय़ाच्या बाजारामध्ये ५५ ते ६५ रुपये इतका दर मिळत आहे. याच्या तुलनेत आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू व गुजरात या राज्यांतून बाजारामध्ये येणारा वाडा कोलमसारखा तांदूळ सध्या ४० ते ४५ रुपयांत सहज उपलब्ध होत आहे. वाडय़ामधील तसेच वाडय़ाबाहेरील अनेक व्यापाऱ्यांनी देशातून वेगवेगळ्या ठिकाणांहून आणलेल्या तांदळाचे पॅकिंग वाडा कोलम या नावाने करून पालघर जिल्ह्य़ातील या प्रसिद्ध तांदळाच्या प्रजातीला मोठे आव्हान उभे केले आहे.

कसा ओळखाल अस्सल?

वाडा कोलम हा भात दोन वेळा पॉलिश केल्यानंतर देखील रंगाने काहीसा कमी सफेद असतो. मात्र हा भात शिजवल्यानंतर त्याची विशिष्ट चव ही जाणकारांना मोहित करते. याच्या तुलनेत परराज्यातून येणाऱ्या भाताच्या जातींना विशिष्ट प्रकारे ‘सिल्क पॉलिश’ केले जात असल्याने वाडा कोलमच्या तुलनेत तो तांदूळ प्रारंभी अधिक चमकदार व उठावदार दिसतो. मात्र २-३ महिन्यांनी तो तांदूळ काहीसा काळपट होऊन त्याची चमक कमी होते.

वाडा कोलमचा उत्पादन खर्च ६० रुपये किलोच्या जवळपास असून हा तांदूळ बाजारात ७०-९० रुपयांनी विकला जातो. सिल्क पॉलिश केल्यामुळे परराज्यातील कोलम हा वाडापेक्षा अधिक आकर्षक असतो, तसेच किमतीने हा तांदूळ २०-२५ रुपये स्वस्त असल्याने ग्राहक त्याला पसंती देतात. मात्र नंतर फसगत झाल्याची भावना निर्माण होते. ही बनवाबनवी थांबविण्यासाठी शासनाने उपाययोजना करायला पाहिजे.   – रोहिदास पाटील, शेतकरी व भात गिरणी मालक, वाडा

शेतकऱ्यांनी वाडा कोलमची शेती पारंपरिक पद्धतीने न करता यांत्रिकीकरणाचा अवलंब करून उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. वाडा कोलमसाठी वाडा तालुक्यात सुपिक जमीन आहे, मात्र रासायनिक खतांमुळे ही तांदळाची जात धोक्यात आली आहे. लागवडीतील उत्पादन खर्च कमी करणे तसेच सेंद्रिय खतांचा वापर होणे आवश्यक आहे.   -अनिल पाटील, कृषिभूषण, सांगे, ता. वाडा

अमेरिकेतही फसवणूक!

अमेरिकेतील टेक्सास येथे आपल्या मुलाकडे वाडय़ातील एक शेतकरी गेले असता तेथील सुपरमार्केटमध्ये विकला जाणारा ‘वाडा कोलम’ खरेदी केला. त्याच्या पिशवीवर छापील पत्ता पाहिल्यानंतर हा तांदूळ तेलंगणमधील निझामाबाद येथे उत्पादित केल्याचे दिसून आले.

वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांना पूर्वीसारखेच वाडा कोलमचे उत्पन्न घेण्यास प्रवृत्त केले जाणार आहे. त्यासाठी कृषी विभागाकडून मोठय़ा प्रमाणावर शेतकऱ्यांना यापुढे मार्गदर्शन करून सहकार्य केले जाईल. भौगोलिकदृष्टय़ा मूळ स्थान दर्शविण्यासाठी जीआय टॅग (जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग) मिळविण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू असून, तसे झाल्यास या जातीचा प्रचार आणि प्रसार होईल. ग्राहकांची होणारी फसवणूक कमी होईल.  – प्रवीण गवांदे, उपविभागीय कृषी अधिकारी, वाडा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2018 1:13 am

Web Title: fake rice in india
Next Stories
1 भारतासह विदेशातही ‘लेट अवनी लिव्ह’ मोहीम
2 विकास कामांचा निधी शंभर टक्के खर्च करावा
3 पोलिसांवरील अतिरिक्त कामांचा भार कमी करा!
Just Now!
X