14 December 2017

News Flash

माथेरानच्या जंगलात तोतया सर्पमित्रांची वळवळ

सर्पमित्राच्या नावाखाली काही तोतये सध्या सापांचे ‘हार्पिग’ करण्यासाठी जंगलात फिरत आहे

अक्षय मांडवकर, मुंबई | Updated: September 27, 2017 3:29 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

जंगलातील तस्करी वाढल्याने सर्प परिसर्ग धोक्यात; प्राणिमित्रांचा परिसरात रात्रीला पहारा

माथेरानमधील सर्प परिसर्ग धोक्यात आला आहे. तोतया सर्पमित्रांची येथील संख्या गेल्या काही वर्षांत बेसुमार वाढल्याने येथील सर्प तस्करीचे प्रमाण वाढले असून निसर्गात महत्त्वाचे स्थान असलेल्या सापांना अवैधरीत्या हाताळले जात आहे. पावसाळ्यात साप मोठय़ा संख्येने बाहेर पडत असल्याने तस्करीच्या हेतूने अनेक तोतया सर्पमित्र या भागात दाखल होत आहेत.

वन्यजीवांच्या विविधतेसाठी माथेरानमधील जंगल समृद्ध आहे. साप, बेडूक आणि सरडय़ाच्या अनेक  प्रजाती माथेरानाच्या जंगलात आढळतात. हरणटोळ, ढोल मांजऱ्या, कोब्रा, नाग, पीट वायपर या सापांच्या प्रजाती या परिसरात पाहिल्या जातात. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार कोणत्याही वन्यजीवांची तस्करी वा संबंधित विभागाच्या परवानगीशिवाय त्यांना हाताळणे कायदेशीर गुन्हा आहे. संशोधक किंवा सर्पमित्राच्या नावाखाली काही तोतये सध्या सापांचे ‘हार्पिग’ करण्यासाठी जंगलात फिरत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. याशिवाय मुंबई-पुण्याहून आलेले अतिउत्साही पर्यटक सापांना हाताळत असल्याचे वन्यजीव निरीक्षकांनी सांगितले.

मुंबईहून येणाऱ्या अनेक तोतया सर्पमित्र या काळात अवैधरीत्या सापांची तस्करी करीत असल्याचे प्राणीमित्र पवन गडवीर यांनी सांगितले. गडवीर यांच्यासह १०१ स्थानिक प्राणीमित्र रात्रीच्या वेळी जंगलात पहारा देतात.

सापांची मोठी किंमत बाजारात मिळते. त्यांना बाटलीबंद करून विकले जाते. परंतु त्यांना आळा घालण्यासाठी सध्या जंगलात पहारा देण्याचे काम सुरू असल्याचे गडवीर म्हणाले. याकामी नेरळ-माथेरान टॅक्सीचालक गडवीर यांच्या गटाला मदत करतात. तोतया सर्पमित्र वा तस्कर दिसल्यास त्याची माहिती गडवीर यांना देतात. दोन दिवसांपूर्वी अशीच एक टोळी जंगलात आल्याची माहिती चालकाने दिली होती, मात्र तिचा शोध लागला नाही. ‘डब्लूडब्लूएफ’चे स्वयंसेवक अक्षय शिंदे यांनाही काही दिवसांपूर्वी माथेरानच्या जंगलात असाच अनुभव आला. नेरळमध्ये सापांची कमतरता आहे, असे सांगून एक व्यक्ती हरणटोळ जातीचा साप बेकायदा पद्घतीने घेऊन जात असल्याचे अक्षय यांच्या निदर्शनास आले होते. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार ‘शिकार’ म्हणजे केवळ एखाद्या प्राण्याला मारून टाकणे एवढेच मर्यादित नसून त्याची अवैध वाहतूक करणे, इजा पोहोचविणे, विनापरवानगी हाताळणे म्हणजेही शिकारच असल्याची माहिती ठाणे वनविभागाचे वन्यजीव संरक्षक पवन शर्मा यांनी दिली.

हार्पिग काय?

वनविभागाच्या परवानगीशिवाय जंगलात जाऊन सरपटणाऱ्या किंवा उभयचर प्राण्यांना हाताळणे, त्यांची वाहतूक करणे, त्यांना त्यांचा नैसर्गिक अधिवासातून हलविणे म्हणजे हार्पिग करणे. पावसाळ्यात अनेक टोळ्या गटागटाने जंगलात अवैध हार्पिगसाठी जातात. अवैध हार्पिग हा वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा आहे.

First Published on September 27, 2017 3:29 am

Web Title: fake snake charmers in the forest of matheran