सौरभ कुलश्रेष्ठ

करोनामुळे जगभरातील दळणवळण ठप्प झाल्यामुळे खनिज तेलाचे दर मागणी अभावी गडगडल्याने उसाच्या रसापासून साखरेपेक्षा इथेनॉलला पसंती देणाऱ्या ब्राझीलने आता साखर उत्पादनाकडे मोर्चा वळवला आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेची आवक वाढण्याची चिन्हे असल्याने भारतातील साखरेला मिळणारा सरासरी २४०० रुपये प्रति क्विंटलचा दर दोन हजार रुपयांपर्यंत घसरल्याने आर्थिक तोटय़ाबरोबरच शिल्लक साखरेच्या निर्यातीचा प्रश्न महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसमोर उभा ठाकला आहे.

मार्च महिन्यापासून जगातील देशांनी टाळेबंदी जाहीर करण्यास सुरुवात के ल्याने आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत वाहतूक थांबली. त्यातून पेट्रोल-डिझेलच्या मागणीत प्रचंड घट होण्यास सुरुवात झाली. सोमवारी तर खनिज तेलाचे दर उणे पातळीवर गेल्याची अभूतपूर्व घटना घडली. या सर्व काळात खनिज तेलाची बाजारपेठ कोसळत असल्याचे पाहून जगात साखर-इथेनॉलच्या व्यवसायातील बडे प्रस्थ अशी ओळख असलेल्या ब्राझीलने काही दिवसांपूर्वी धोरणात्मक बदल करत उसाच्या रसापासून इथेनॉलऐवजी साखर उत्पादनास अधिक पसंती देण्याचे ठरवले. मागील काही वर्षे ब्राझिलने उसाच्या रसापासून ६७ टक्के  इथेनॉल तर ३३ टक्के  साखर उत्पादन के ले. मात्र, खनिज तेलाची बाजारपेठ घसरू लागल्यानंतर त्यांनी ४८ टक्के  साखर उत्पादन व ५२ टक्के  इथेनॉलनिर्मिती असे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे ब्राझिलचे ६० ते ७० लाख टन अधिक साखर बाजारात येणार असून त्यातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील साखरेचे दर ४२५ डॉलर प्रति टनवरून ३०० डॉलर प्रति टन असे घसरले, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली.

झाले काय?

* ब्राझीलने साखरेच्या उत्पादनाचे प्रमाण वाढवल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. पुढील वर्षभर हा परिणाम जाणवणार आहे. सप्टेंबर २०२० पर्यंत केंद्र सरकारने देशातून ६० लाख टन साखर निर्यातीला मंजुरी दिली होती. पैकी जवळपास ३८ लाख टनांचे करार झाले असून २८ लाख टन प्रत्यक्ष निर्यात झाली आहे. भारताच्या साखरेला प्रति क्विंटल २४०० रुपयांपर्यंत दर मिळत होता. तो दोन हजार रुपयांपर्यंत खाली आल्याने अनेक कारखान्यांना फटका बसला असून आता शिल्लक २२ लाख टन साखरेच्या निर्यातीचा प्रश्न उभा ठाकला आहे, असे नाईकनवरे यांनी सांगितले.

* महाराष्ट्रातील सुमारे १८ लाख टन साखरेला निर्यातीसाठी परवानगी मिळाली होती. पैकी १० लाख टनांचे करार झाले. आता जवळपास आठ लाख टनांच्या निर्यातीचा प्रश्न उभा ठाकला आहे. खनिज तेलाच्या बाजारपेठेतील घसरणीमुळे ब्राझिलने साखर उत्पादनाचे प्रमाण वाढवल्याने होत असलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आर्थिक फटका महाराष्ट्रातील साखर उद्योगाला बसत आहे, अशी प्रतिक्रि या राज्य साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी दिली.