मुंबई : निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माझ्याविरुद्ध तसेच परिवहन आयुक्त व इतर पाच अधिकाऱ्यांविरोधात नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार ही पूर्णत: निराधार व खोटी आहे, असे स्पष्टीकरण परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे.

विभागातील अनेक तक्रारीच्या पार्श्वभूमीवर निलंबित झालेल्या या अधिकाऱ्याने सूडबुद्धीने खोटे आरोप करून माझी व महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्याचे षड्यंत्र आखले आहे, असे परब यांनी म्हटले आहे. मंत्र्यांवर आरोप करून राज्य सरकार काहीही कारवाई करत  नाही, असे भासवून उच्च न्यायालयामार्फत सीबीआय चौकशीची मागणी करायची आणि सरकार व मंत्र्यांची प्रतिमा मलिन करायची, या राजकीय हेतूने केलेली ही तक्रार असल्याचा आरोप परब यांनी केला आहे. चौकशीअंती सत्य जनतेसमोर नक्कीच येईल, असे परब यांनी स्पष्ट केले.