एलबीटीचा अभ्यास करणारी समिती सरकारने नेमलेली नाही. त्या संदर्भात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी फेडरेशन असोसिएशन ऑफ महाराष्ट्राने रविवारी एपीएमसी बाजारात राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे.
मुंबई पालिका क्षेत्रवगळता राज्यात एक एप्रिलपासून लागू करण्यात आलेल्या स्थानिक संस्था कराला (एलबीटी) फॅम या व्यापाऱ्यांच्या मध्यवर्ती संस्थेने विरोध केला आहे. मे महिन्यात हे आंदोलन चालल्याने सरकारने यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व माजी मंत्री मुरली देवरा यांच्यासमोर समिती नेमण्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आश्वासन दिले होते. पावसाळी अधिवेशन संपले तरी हे आश्वासन न पाळल्याने फॅमने आता पुन्हा आंदोलनचा पवित्रा घेण्याचे ठरविले आहे. त्यासाठी रविवारी राज्यातील व्यापारी प्रतिनिधींची एक बैठक सकाळी ११ वाजता एपीएमसी बाजारात आयोजित केली आहे.