आई-वडील दोघांच्या सान्निध्यात, सहवासात राहण्याचा आणि प्रेम मिळवण्याचा प्रत्येक मुलाला अधिकार आहे. त्यामुळे मुलांचे वय हे त्याला विभक्त दाम्पत्यापैकी ताबा नसलेल्या पालकासोबत एक रात्र वास्तव्य करू न देण्याचा मुद्दा ठरू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत कुटुंब न्यायालयाने एका पित्याची त्याच्या तीन वर्षांच्या मुलीसोबत त्याच्या घरी दिवाळी साजरी करण्याची मागणी मान्य केली.

लहान वयात मुलांना आईवडील दोघांची गरज असते. त्यांच्यासोबत आनंद लुटण्याचा, त्यांच्या सान्निध्यात राहण्याचा प्रत्येक मुलाला अधिकार आहे. त्यामुळे घटस्फोटाच्या प्रकरणातील मुलांना त्यांचा ताबा न मिळालेल्या पालकाकडे राहण्याचा, त्याचे व आजी-आजोबांचे प्रेम मिळविण्याचा तेवढाच अधिकार आहे. असे केल्यास त्यांच्यातील नातेसंबंध अधिक घट्ट होण्यास मदत होईल. हेच नमूद करत तीन वर्षांच्या मुलीला दिवाळीसाठी आपल्या घरी नेण्याची आणि तिच्यासोबत दिवाळी साजरी करण्याची पित्याची मागणी न्यायालयाने मान्य केली. तसेच प्रकरणातील पत्नीने मुलीला पतीकडे ठेवण्याच्या न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी न केल्यास तिला दंड भरावा लागेल, असेही न्यायालयाने बजावले आहे. मात्र मुलीला शहराबाहेर नेण्यास न्यायालयाने पतीला मज्जाव केला आहे.

पती व सासू-सासऱ्यांना तांत्रिकाला घरी बोलावून विचित्र धार्मिक विधी करण्याची सवय असल्याचा आरोप पत्नीने करून पतीची मागणी फेटाळून लावण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने मात्र तिचा हा आरोप फेटाळून लावत ही बाब सद्य:स्थितीत विचारात घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. परंतु नंतर दोन्ही पक्षांकडून त्याबाबतचे साक्षीपुरावे ऐकल्यावर निर्णय घेतला जाईल, असेही नमूद केले. शिवाय दिवाळी साजरी करण्यासाठी मुलीला पतीच्या घरी न पाठविण्यासाठीचे ठोस कारणही पत्नीकडे नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने तिची मागणी फेटाळून लावली. मुलीचा ताबा पत्नीकडेच असून महिन्यातील तीन रविवारी मुलीला भेटण्याची मुभा आपल्याला न्यायालयाने दिलेली आहे. मात्र पत्नी मुलीला भेटू देत नसल्याचा आरोपही पतीने केला होता.