पानसरे हत्या प्रकरणी कुटुंबियांची उच्च न्यायालयात मागणी

मुंबई : राज्याच्या विशेष तपास पथकातर्फे (एसआयटी) केला जाणारा कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास सुमार असून तो अन्य तपास यंत्रणेकडे सोपवावा, अशी मागणी पानसरे यांच्या कुटुंबियांनी सोमवारी उच्च न्यायालयात केली. त्यावर तोंडी मागणी करण्याऐवजी त्याबाबत रीतसर अर्ज करण्याची सूचना न्यायालयाने कुटुंबियांना केली.

दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तुल दोन आठवडय़ांत शोधले जाईल आणि त्यानंतर लगेचच आरोपपत्र दाखल करू, असा दावा ‘सीबीआय’ने केला.

डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या तपासाप्रकरणी दाभोलकर-पानसरे कुटुंबियांनी केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. त्या वेळी दाभोलकर हत्येचा तपास करणाऱ्या सीबीआय, तर पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ‘एसआयटी’ने तपासाशी संबंधित मोहोरबंद अहवाल न्यायालयात सादर केला. त्यानंतर पानसरे कुटुंबियांच्या वतीने तपासाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. ‘एसआयटी’ या प्रकरणाचा सुमार तपास करीत आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून तपास अधिकारी महत्त्वाची माहिती उपलब्ध असतानाही त्यादृष्टीने काहीच करत नसल्याचा आरोप पानसरे यांच्या कुटुंबियांच्या वकिलांनी केला. तसेच या हत्येचा तपास अन्य यंत्रणेकडे सोपवण्याची हीच योग्य वेळ असून तो अन्य यंत्रणेकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी पानसरे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली. त्यावर, तोंडी मागणी करण्याऐवजी यासंदर्भात रीतसर अर्ज करण्याची सूचना न्यायालयाने त्यांना केली. तसेच रीतसर अर्ज केल्यास तो विचारात घेतला जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

पिस्तुल शोधण्यासाठी सीबीआयला मुदतवाढ हवी!

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तुल शोधण्यासाठी आणखी दोन आठवडय़ांची मुदतवाढ देण्याची मागणी ‘सीबीआय’तर्फे करण्यात आली. या पिस्तुलाची ठाण्याच्या खाडीत विल्हेवाट लावण्यात आली होती. हे पिस्तुल शोधण्यासाठी राबवण्यात येणारी विशेष मोहीम सुरूच असून दोन आठवडय़ांत ती पूर्ण होईल. त्यानंतर लगेचच या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले जाईल, असे ‘सीबीआय’तर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.