अंधेरी येथील एकाच कुटुंबातील चौघांनी दोन दिवसांत आत्महत्या केल्याच्या घटनेने पोलीस हादरले असतानाच, तपास करताना पुढे आलेल्या एका बाबीमुळे पोलिसही चक्रावले आहेत. आत्महत्या केलेल्या शिखा पाल उर्फ शिखा मनोज पटेल या महिलेच्या ओशिवरा येथील राहत्या घरी पोलिसांना ५० हजार रुपये रोख सापडले आहेत. पोलिसांच्या तपासकामासाठी तरतूद म्हणून आपण हे पैसे ठेवल्याचे शिखा यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. या वृत्ताला पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, टिकूसिंह, किशोरसिंह गर्धव याच्याविरोधात विनयभंग आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या वेळी शिखा पाल यांच्या घरातून पोलिसांना पाल यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी, दोन मोबाइलमधील भारती व सोमनाथ यांची चित्रफीत आणि ५० हजार रुपये सापडले. चिठ्ठीतील मजकुरानुसार पाल यांनी पोलिसांना या प्रकरणाच्या तपासासाठी मदत म्हणून ही ५० हजार रुपयांची तरतूद केली आहे. तर या चित्रफितीवरून भारती व सोमनाथ यांचा घरमालक टिकूसिंह या दोघांचे मानसिक व लैंगिक शोषण करत असल्याचे स्पष्ट होत आहे. या शोषणाला कंटाळूनच दोघांनी आत्महत्या केली. त्यानंतर शिखा पाल यांनी आत्महत्या केल्यावर उच्च रक्तदाबाचा विकार असलेल्या मनोज पटेल यांनी पत्नी व सावत्र मुलांच्या आत्महत्येमुळे धक्का लागल्याने आत्महत्या केली.

पोलिसांनी टिकूसिंह याला अटक केली असून त्याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, विनयभंग करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. टिकूसिंहने भारतीवर बलात्कार केल्याचे यातून आढळल्यास त्याच्या विरोधात गुन्हा दाखल होईल.
विजय चव्हाण,  पोलीस उपनिरीक्षक