खासगी रुग्णालयांकडून करोना व्हायरसवरील उपचारांसाठी मनमानी पद्धतीने दर आकारणी सुरु आहे. करोनाची लागण झाल्यास, खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होणे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. घाटकोपरमधील बांधकाम क्षेत्राशी संबंधित असलेल्या एका रिअल इस्टेट एजंटला याचा अनुभव आला.

ठाण्यातील एका खासगी रुग्णालयाने करोनावरील उपचारांपोटी एका रिअल इस्टेट एजंटला तब्बल १८ लाख रुपयांचे बिल आकारले. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे. रुग्णालयाकडून इतक्या मोठया प्रमाणात बिल आकारण्यात आल्यामुळे या कुटुंबाला मित्रपरिवाराकडून नऊ लाख रुपयाचे कर्ज घ्यावे लागले. या कुटुंबाचा नऊ लाख रुपयांचा विमा होता.

असल्फा घाटकोपरमध्ये राहणाऱ्या या रिअल इस्टेट एजंटला अन्न वाटप करताना कदाचित करोनाची लागण झाली. त्याच्यापासून त्याच्या कुटुंबीयांना सुद्धा करोनाची बाधा झाली. हा एजंट आणि त्याची पत्नी सोडली तर कुटुंबातील अन्य सदस्यांमध्ये करोनाची कुठलीही लक्षणे नव्हती. या एजंटची भूक कमी झाली, थकवा जाणवू लागला तेव्हा त्याला आपल्याला करोनाची लागण झालीय असे वाटले.

त्याने सुरुवातीला टेस्ट केली, तेव्हा त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला पण पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह होता. त्याने पुन्हा चाचणी केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. प्रत्येक चाचणीसाठी त्याला ४,५०० हजार रुपये मोजावे लागले. मुंबईतील कुठल्याही रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने ते ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल झाले.

‘आम्हाला सरकारी रुग्णालयात दाखल व्हायचे नव्हते तसेच एकत्रही रहायचे होते’ असे या एजंटने सांगितले. रुग्णालयात अ‍ॅडमिट होताना कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी त्याने ५० हजार रुपये भरले. अकराव्या दिवशी रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर कुटुंबातील चार सदस्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यावेळी त्याने रुग्णालयात बिलापोटी तीन लाख रुपये भरले. सतराव्यादिवशी कुटुंबातील अन्य चार सदस्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्हच आला. त्यावेळी त्याने रुग्णालयात दोन लाख रुपये भरले व अन्य रक्कम ९ लाखाच्या मेडिक्लेम पॉलिसीमधून वळते झाले.

त्यानंतर महानगर पालिकेने घेतलेल्या एका हॉटेलमध्ये शिफ्ट होण्याचा आम्ही निर्णय घेतला असे त्या एजंटने सांगितले. त्या हॉटेलमध्ये फक्त रुमचे भाडे घेतले व सात दिवसांनी आम्हाला घरी सोडले. “प्रत्येक व्यक्तीच्या औषधोपचारासाठी हॉस्पिटलने ७० हजार रुपये व पीपीई किटपोटी १८ हजार रुपये आकारले” असे त्या रिअल इस्टेट एजंटने सांगितले. हॉस्पिटलचे १८ लाखाचे बिल चुकवण्यासाठी कर्ज काढावे लागले. आता दीर्घकाळ हे कर्ज फेडण्यात जाईल अशी खंत या एजंटने व्यक्त केली.