News Flash

कुटुंबनियोजन योजनेचीच ‘नसबंदी’!

‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेला अत्यल्प प्रतिसाद

‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेला अत्यल्प प्रतिसाद

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी शासनाच्या काळात उदंड घोषणा होत होत्या. आताही गेल्या दोन वर्षांत सत्ताधारी भाजप-सेना युती सरकारने अनेक घोषणा केल्या असून ‘घोषणा उदंड, कारवाई थंड’ अशी परिस्थिती महिला व बालविकास विभागाने जाहीर केलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेची झाली आहे. एका मुलीच्या जन्मानंतर मातेने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी गाजावाजा करून जाहीर केलेल्या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून त्याची आकडेवारीही देण्यास विभागाचे अधिकारी तयार नाहीत. एवढेच नव्हे, तर ही योजना फसल्यानंतर आता सुधारित योजना आणण्याची तयारी चालवली आहे.

महिला व बालविकास विभागाने डिसेंबर २०१५ मध्ये ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत एका मुलीच्या जन्मानंतर मातेने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यास मुलीचा जन्मदिन साजरा करण्यासाठी पाच हजार रुपये पालकांना देण्याचे जाहीर करण्यात आले होते. तसेच मुलीच्या नावावर शासनातर्फे एलआयसीचा २१ हजार २०० रुपयांचा विमा कढण्यात येणार होता. परिणामी, मुलीचे वय अठरा वर्षे झाल्यानंतर विम्याची एक लाख रुपयांची रक्कम मिळणार आहे. त्याचप्रमाणे दोन मुलींच्या जन्मानंतरही मातेने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यास या योजनेचा लाभ देण्यात येणार असून दुसऱ्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अडीच हजार रुपये पालकांना देण्याचे जाहीर करण्यात आले होते. याशिवाय विमा कवचही देण्यात येणार होते. एका मुलीनंतर शस्त्रक्रिया केल्यास मुलगी पाच वर्षांची होईपर्यंत तिचे दर्जेदार पोषण होण्यासाठी कुटुंबाला दरवर्षी दोन हजार रुपये प्रमाणे पाच वर्षांत दहा हजार रुपये दिले जाणार आहेत, तर दोन मुलींनंतर शस्त्रक्रिया केल्यास पाच वर्षांपर्यंत दोन्ही मुलींसाठी मिळून दहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दोन हजार रुपयांमध्ये वर्षभर दर्जेदार पोषण आहार कसा मिळणार हा प्रश्न योजना तयार करणाऱ्यांना व ती मंजूर करणाऱ्यांना कसा पडला नाही, असे विभागातीलच एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत आई व मुलीच्या नावे संयुक्त बचत खाते उघडून एक लाख रुपयांचा अपघात विमा आणि पाच हजार रुपयांपर्यंत ओव्हर ड्राफ्टचा लाभही देण्याचे जाहीर करण्यात आले होते. या योजनेसाठी १५३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून २०१६-१७ या वित्तीय वर्षांसाठी २५ कोटी रुपये उपलब्ध करूनही देण्यात आले होते.

योजना का फसली?

  • विभागातील अधिकाऱ्यांनीच योजनेसाठी ठोस काम न केल्याने योजना लोकांपर्यंत पोहोचलीच नाही
  • परिणामी, फारच थोडय़ा मातांनी या शस्त्रक्रिया केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे
  • याबाबत अधिकृत आकडेवारी खात्याच्या जनसंपर्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे मागितली असता अशी आकडेवारी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले
  • या योजनेंतर्गत दोन-चार कोटी रुपयेही खर्च झाले नसून अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे मुलीच्या जन्मानंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रियाच्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेची ‘नसबंदी’ झाल्याचे दिसून येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 1:20 am

Web Title: family planning scheme
Next Stories
1 युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गाडीला अपघात, कोणीही जखमी नाही
2 मुंबई विमानतळावरील मुख्य रन वे फेब्रुवारीपासून दररोज ८ तास बंद
3 मॅरेथॉनला २३ लाख रुपयांच्या पे ऑर्डरवर परवानगी
Just Now!
X