भूजल पातळी पाच मिटरने खाली गेल्यामुळे आणि चाराही कमी पडू लागल्यामुळे राज्यातील दुष्काळीची तीव्रता अधिक वाढू लागली आहे. त्यामुळे चारा छावण्या उघडण्यासाठी असलेली पाच लाख रुपये अनामत रक्कमेची अट मराठवाडय़ासाठी शिथील करण्याचा निर्णय मदत व पुनवर्सनमंत्री पंतगराव कदम यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.
राज्यात सध्या १६१३ टँकर्सच्या माध्यमातून दुष्काळी गावामंध्ये पाणीपुरवठा केला जात आहे. तर ४२० ठिकाणी चारा छावण्या सुरू असून गेल्या काही दिवसांपासून चारा छावण्यांची मागणी वाढत आहे. मात्र मराठवाडय़ात छावण्याच सुरू करण्यासाठी संस्था पुढे येत नसल्याची बाब आज मंत्रिमंडळ उपसमितीच्या निदर्शनास आणण्यात आली.
त्यावर मराठवाडय़ात छावणी सुरू करण्याबाबत असलेली पाच लाख रूपये अनामत रक्कमेची अट शिथील करण्यात आली असून दोन लाख रूपये अनामत रक्कम भरणाऱ्यांनाही छावण्या सुरू करण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचे पतंगराव कदम यांनी सांगितले. तसेच दुष्काळी तालुक्यांसाठी १० कोटींचे पॅकेज देण्याची मागणी आजच्या बैठकीत करण्यात आली असल्याचेही कदम यांनी सांगितले.