X
X

अभिनेत्री सेजल शर्माची गळफास घेऊन आत्महत्या

नैराश्याला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्यचे तिने सुसाईड नोट मध्ये नमूद केले आहे.

टिव्ही मालिकेत काम करणारी अभिनेत्री सेजल शर्मा (२५) हिने शुक्रवारी सकाळी मिरा रोड येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नैराश्याला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे तिने आत्महत्येपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. स्टार प्लसवरील ‘दिल तो हैप्पी है’ या मालिकेत तिने प्रमुख भूमिका साकारली होती.

राजस्थानच्या उदयपूरला राहणारी सेजल शर्मा २०१७ मध्ये मुंबईला आली होती. मिरा रोड पुर्वेच्या शिवार गार्डर परिसरातील रॉयल नेस्ट या इमारतीत ती मैत्रीणीसह रहात होती. शुक्रवारी सकाळी घरातील पंख्याला गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. “मी दिड महिन्यांपासून नैराश्यात असल्याने आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येस कुणाला जबाबदार ठरवू नये”, असे तिने चिठ्ठीत लिहिल्याची माहिती मिरा रोड पोलिसांनी दिली आहे.

स्टार प्लस या वाहिनीवरील “दिल तो  हैप्पी हे” या मालिकेत सेजलने सिम्मी खोसला ही प्रमुख भूमिका साकारली होती. काही महिन्यांपूर्वी ही मालिका बंद पडली होती. तेव्हापासून सेजल कामाच्या शोधात होती. मात्र काम मिळत नसल्याने ती नैराश्यात होती, असे पोलिसांनी सांगितले. तिच्या आत्महत्येमागे आणखी काही खाजगी कारणे आहेत का त्याचा शोध घेत आहोत, असे मिरा रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप कदम यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच कुशल पंजाबी या अभिनेत्याने आत्महत्या केली होती. त्यापाठोपाठ सेजल शर्माने आत्महत्या केल्याने बॉलीवूड विश्व हादरले आहे. शवविच्छेदनानंतर सेजलचा मृतदेह तिच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला असून उदयपूर येथील तिच्या मूळ गावी अंत्यसंस्कार कऱण्यात येणार आहेत.

20
First Published on: January 24, 2020 10:01 pm
Just Now!
X