02 March 2021

News Flash

ज्येष्ठ चित्रकार रामकुमार कालवश

भारतीय भूदृश्यांना चिंतनशील अमूर्त रूप देणारे विख्यात चित्रकार रामकुमार यांचे शनिवारी पहाटे निधन झाले.

रामकुमार

भारतीय भूदृश्यांना चिंतनशील अमूर्त रूप देणारे विख्यात चित्रकार रामकुमार यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. सिमल्यात जन्मलेले रामकुमार तरुण वयातच दिल्लीस आले, दिल्लीतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला, तरी मुंबईशी त्यांचे विशेष नाते होते.

रामकुमार यांचे वडील सरकारी अधिकारी होते, तर हिन्दी नवसाहित्याचे अग्रदूत निर्मल वर्मा हे त्यांचे धाकटे बंधू. स्वत: रामकुमार यांनीही हिंदीत लिहिलेल्या कादंबऱ्या व निबंधांची पुस्तके झाली आहेत. पण चित्रकार म्हणूनच त्यांना अधिक मान मिळाला आणि तोही मुंबईमुळे!  सर्वच क्षेत्रांतील प्रागतिक कलावंतांना १९५०च्या दशकात मुंबई आपली वाटे. रामकुमार हे मूळचे दिल्लीच्या स्टीफन्स कॉलेज या संस्थेत अर्थशास्त्राचे विद्यार्थी.. पण आर्थिक समस्यांविषयीची तगमग व्यक्त करण्यासाठी त्यांनी चित्रकलेचा आधार घेतला. त्यासाठी दिल्लीतच शारदा उकील यांच्या कलाशाळेत त्यांनी कौशल्यशिक्षणही घेतले. प्रोग्रेसिव्ह आर्टस्टि ग्रूपच्या ओढीने मुंबईस आलेल्या रामकुमार यांना, तोवर हा गट विरूनच गेला असला तरी मूळच्या प्रोग्रेसिव्ह गटातील एमएफ हुसेन आणि नंतरच्या कलावंतांपैकी तय्यब मेहता, अकबर पदमसी असे मित्र भेटले. तेव्हा रामकुमार यांची ‘व्हेगाबॉण्ड’ आदी चित्रे आर्थिक-सामाजिक वास्तव दाखवणारी  होती. शहरीकरणाचे वास्तव टिपणाऱ्या त्यांच्या कुंचल्याने फ्रान्स आदी देशांना भेटी दिल्यानंतर भारतीय वळण शोधले.. आणि ते त्यांना मुंबईत तोवर रुजलेल्या अमूर्त चित्रपरंपरेतून गवसले.

सामाजिक वास्तवाचा दाह त्यांच्या कलाकृतींतून दिसेनासा झाला; पण त्या वास्तवाचे आर्त आता त्यांच्या चित्रांमधून व्यक्त होऊ लागले. रामकुमार यांच्या चित्रांतील उदासी ही त्यांच्या एकटय़ाच्या दु:खांसाठी नसून व्यापक आहे आणि दु:खाची व्याप्ती वाढविण्याची ही रीत भारतीय आहे, अशी दाद तत्कालीन विचक्षण संपादक शामलाल यांनी दिली होती.

निगर्वी साधेपणा ..

रामकुमार यांच्या चित्रांना व्यावसायिक यश मिळवून देण्यात मुंबईच्या – काली पंडोल यांनी स्थापलेल्या व त्यांचे पुत्र दादीबा यांनी चालविलेल्या पंडोल कलादालनाचा मोठा वाटा होता. दादीबा व कलाव्यवहार सांभाळणाऱ्या त्यांच्या पत्नी खुर्शीद हे देशाबाहेर असल्याने दिल्लीत रामकुमार यांच्या अंत्यविधीस जाऊ शकले नाहीत.

पंडोल दालनात अनेक प्रदर्शने भरविणाऱ्या रामकुमारांचे एक मोठे प्रदर्शन मात्र मुंबईच्या केमोल्ड या दुसऱ्या खासगी कलादालन भरले. ते कसे? ‘‘केमोल्ड गॅलरीचे संस्थापक – माझे वडील केकू गांधी हेही रामकुमारांचे जिवश्च मित्र. पपांच्या ८६व्या वाढदिवसाला रामकुमार यांचा अचानक संदेश आला – काय देऊ मित्रा तुला? थांब, एक प्रदर्शनच भरवतो तुमच्याकडे! आमची तारांबळ झाली, पण वर्षभरात रामकुमारांचं प्रदर्शन आम्ही केलं.. ते मोठे चित्रकार असूनही साधे आणि निगर्वी होते, म्हणूनच हे शक्य झालं – अशा भावना केमोल्ड प्रिस्कॉट रोडच्या संचालिका शिरीन गांधी यांनी ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केल्या.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2018 1:20 am

Web Title: famous artist ram kumar passes away at the age of 93 in delhi
Next Stories
1 नाणार विरोधकांचे ‘बोलविते धनी’कोण?
2 विशेष वाहनतळ प्राधिकरण नियुक्तीचा प्रस्ताव
3 पालिका अधिकाऱ्यांच्या हप्तेखोरीमुळे शेतकरी हवालदील
Just Now!
X