News Flash

खाऊखुशाल : पावभाजी : नवा रंग, नवा ढंग

खडा हंडी पावभाजीसुद्धा नावाप्रमाणेच आहे. पावभाजीच्या सर्व भाज्या आणि साथीला पनीरचे तुकडे.

अनेक खाद्यपदार्थाचे रंग, रूप आणि चवीने आपल्या मनात घर केलेले असते. ती गोष्ट तशी दिसली नाही तर सामान्यपणे त्याच्या वाटय़ाला जाण्यास कचरतो. हा नियम बनविणाऱ्यांनाही लागू होते. क्वचितच एखाद्या प्रचलित पदार्थावर वेगळा प्रयोग करून लोकांच्या जीभेला त्याची सवय लावली जाते. अस्सल खवय्ये मात्र नेहमी थोडी वेगळी फोडणी असलेल्या पदार्थाच्या शोधात असतात. असाच एक वेगळ्या रंगाचा आणि फोडणीचा पदार्थ बोरिवली पश्चिमेला ‘माँ अंजानी पावभाजी सेंटर’वर मिळतो. दिनेश त्रिवेदी आणि त्यांची दोन मुले देवांग आणि अभिषेक यांनी तीन वर्षांपूर्वी एक वेगळा प्रयोग करायचं ठरवलं. फास्ट फूडमधील नावाजलेल्या पावभाजीचा चेहरामोहराच त्यांनी बदलून टाकला. पावभाजीच्या भाजीचा रंग जेवढा गडद लाल तेवढी ती चटपटीत असा जणू काही विधिलिखित नियमच. पण तो मोडण्याचं धाडस त्रिवेदींनी केलं. त्यांनी पावभाजीची भाजी चक्क गडद चॉकलेटी किंवा काळ्या रंगाच्या जवळपास जाणाऱ्या रंगात लोकांसमोर सादर केली. गेल्या तीन वर्षांत ती ‘ब्लॅक पावभाजी’ म्हणून नावारूपाला आली आहे.

पावभाजीची भाजी करताना नेहमीप्रमाणे इथेही टोमॅटो, बटाटा, सिमला मिरची, वाटाणे, फ्लॉवर या भाज्या लागतात. बाकीचा सर्व खेळ आहे मसाल्यांचा. त्रिवेदींनी पावभाजीची मूळ चव कायम ठेवत पण रंगाच्या संकल्पनेला छेद देण्यासाठी वेगळा मसाला तयार केला आहे. या नवीन रंगाच्या पावभाजीमध्ये तब्बल सतरा वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक मसाले वापरले आहेत. हे मसालेसुद्धा ते तीन वेगवेगळ्या ठिकाणांवरून तयार करून घेतात. त्यामुळे भाजीचा रंग तर बदलतो आणि ती आरोग्यदायीसुद्धा होते. याचा प्रत्यय भाजी खाताना आवर्जून येतो. घास घेताच वेगळ्या मसाल्यांची चव तुमच्या जीभेवर तरळते. ग्राहकांच्या आवडीप्रमाणे ती कमी-अधिक तिखटही बनवली जाते. पावभाजीसोबत येणाऱ्या पावांचीही वेगळी मजा आहे. केवळ बटरमध्ये लगडलेल्या पावाऐवजी तो असतो कोिथबिर पाव. बारीक चिरलेली भरपूर कोथिंबिर आणि काही विशिष्ट मसाले मोठय़ा तव्यावर घेऊन त्याला एकजीव केलं जातं. पावासाठी खास लो-फॅट बटर वापरण्यात येतं. त्यामुळे फास्ट फूडमध्ये गणल्या गेलेल्या नेहमीच्या पावभाजीपेक्षा वेगळा रंग, विशिष्ट मसाले, कोथिंबिर, लो-फॅट बटर यामुळे ही पावभाजी वेगळी ठरते.

mv08

दुसरं म्हणजे एका पावभाजीवरच इथलं वेगळेपण संपत नाही. अंजानी स्पेशल खडा हंडी पावभाजी, चमचम, झवेरी बाजारचा फेमस पुडला, हरियाली तवा पुलाव, खिचिया पापड (मारवाडी पिझ्झा) हे पदार्थदेखील तुमची भूक चांगलीच चाळवतात आणि तृप्तही करतात. खडा हंडी पावभाजीसुद्धा नावाप्रमाणेच आहे. पावभाजीच्या सर्व भाज्या आणि साथीला पनीरचे तुकडे. हंडीवर किसलेले चीज आणि केवळ बटरमध्ये तयार केलेली ही भाजी एकटय़ा माणसाला संपता संपत नाही. चमचम म्हणजेच मसाला पाव. ‘ब्लॅक पावभाजी’चाच मसाला यामध्ये वापरण्यात आल्यामुळे तो नेहमीच्या मसाला पावापेक्षा वेगळा ठरतो. पुडल्याचे येथे जवळपास पंधरा प्रकार मिळतात. हे सर्व पुडला बेसनचा वापर करून तयार केले जातात. त्यामध्ये बटर, चीज, ब्रेड, सँडविच, मसूर, कॉर्न, पनीर, मेथी, केरला मसाला, दिलखुश पुडला अशा नानाविध व्हरायटी आहेत. मारवाडी पिझ्झा म्हणजेच खिचिया पापडचेही तब्बल आठ प्रकार इथे मिळतात.

वेगळा पदार्थ म्हटला की सर्वात आधी चर्चा होते त्याच्या किमतीची. पण इथे मिळणाऱ्या ‘ब्लॅक पावभाजी’ची किंमत इतर (लाल रंगाच्या) पावभाजीप्रमाणेच केवळ शंभर रुपयांपासून सुरू होते. पुडला, चमचम आणि खिचिया पापड यांच्याही किमती पन्नास ते शंभर रुपयांमध्येच आहेत. एका वेळेस साठ ते सत्तर माणसं बसतील अशी चांगली व्यवस्था येथे आहे.

माँ अंजानी पावभाजी सेंटर

कुठे- शॉप नं.२२, आदित्य अपार्टमेंट, बोरिवली बिर्याणी सेंटरच्या बाजूला, िलक रोड, चिकूवाडी, बोरिवली (पश्चिम), मुंबई.

कधी- संध्याकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2016 1:20 am

Web Title: famous black pav bhaji of maa anjani pav bhaji center
Next Stories
1 यंदा राज्यात १६ टक्के अधिक पाऊस
2 सेवाव्रतींच्या कार्याला दाद
3 ‘झोपु’ प्राधिकरणाला गृहप्राधिकरणाचा धक्का !
Just Now!
X