अंबानी यांना धमकी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या घराबाहेर सापडलेला स्फोटकांचा साठा आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी विशेष न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) बुधवारी आणखी ६० दिवसांची मुदतवाढ दिली.

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासह अन्य आरोपींवर एनआयएला १० जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करायचे होते. मात्र ही मुदत संपल्याने आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी ६० दिवसांची मुदतवाढ देण्याची विनंती एनआयएने विशेष न्यायालयाकडे केली होती. वाझेसह अन्य आरोपींवर एनआयएने बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कायद्याअंतर्गत तपास यंत्रणा आरोपपत्र दाखल करण्यासाठी १८० दिवसांची मुदतवाढ मागू शकते.

त्याच पार्श्वभूमीवर तपास पूर्ण करण्यासाठी आणखी ९० दिवसांची मुदतवाढ देण्याची विनंती एनआयएने विशेष न्यायालयाकडे केली होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू निर्बंधांमुळे साक्षीदार जबाबासाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत. शिवाय पुरावे गोळा करण्यावरही बंधने आली. त्याचप्रमाणे आतापर्यंतच्या तपासात मोठ्या प्रमाणात पुरावे जमा करण्यात आले असून त्याचे विश्लेषणही करण्यात आलेले नाही. या पार्श्वभूमीवर एनआयएने आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची मुदतवाढ देण्याची विनंती केली होती.

या प्रकरणी पाच आरोपी असून त्यांनी स्फोटकांसह धमकीची चिठ्ठी अंबानी यांच्या बंगल्याबाहेर ठेवली होती. त्यानंतर दहशतवादी संघटनेने या धमकीची जबाबदारी घेणे, यासह सगळ्या कटाचा तपास करायचा असल्याने आरोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ देण्याची विनंती केल्याचे एनआयएने म्हटले होते.

आरोपींच्या वतीने एनआयएच्या विनंतीला विरोध करण्यात आला. न्यायालयाने मात्र एनआयएला आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० ऐवजी ६० दिवसांची मुदतवाढ दिली. या गुन्ह्याचा विविध दृष्टिकोनातून तपास केला जात आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाणे गरजेचे असून त्यासाठी वेळ लागू शकतो. त्यामुळेच एनआयएची मुदतवाढीची विनंती मान्य केली जात असल्याचे न्यायालयाने म्हटले.