मुंबईकरांना पावाविषयी विशेष प्रेम आहे. वडा-पाव, भजी-पाव, पाव-भाजी, खिमा-पाव, ऑमलेट-पाव, भुर्जी-पाव हे आपल्याला माहीत असलेले आणि सगळीकडे सहज मिळणारे पदार्थ. मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील रगडा-पावही तेवढाच प्रसिद्ध आहे. पण तुम्ही कधी पाव-पॅटीस हा प्रकार ऐकला आहे का? कांदिवली पश्चिमेला डहाणूकरवाडीच्या चौकातील एका फुटपाथवर असलेल्या स्वागत पाव-भाजीच्या स्टॉलवर हा पदार्थ मिळतो. वयाची पासष्टी गाठलेल्या भालचंद्र म्हात्रे आजोबांनी जवळपास १८ वर्षांपूर्वी या वेगळ्या पदार्थाचा ‘शोध’ लावला आणि विशेष म्हणजे त्याची अद्याप कुणीही नक्कल केलेली नाही. त्यामुळे मुंबईत पाव-पॅटिस खायचे तर ‘स्वागत’कडे जाण्याखेरीज पर्याय नाही.
चारकोप येथील कॅप्सूल कंपनीतील नोकरी सुटल्यानंतर कांदिवली गाव येथे राहणाऱ्या म्हात्रे आजोबांनी ३० वर्षांपूर्वी डहाणूकरवाडीच्या नाक्यावरच स्वागत पाव-भाजी हा स्टॉल टाकला. त्या वेळी त्यांच्याकडे पाव-भाजी, पाणी-पुरी, रगडा-पॅटीस हे पदार्थ मिळत. काही तरी नवीन करायचं म्हणून त्यांनी साधारण १८ वर्षांपूर्वी पावामध्ये पॅटीस घालून देण्यास सुरुवात केली. पावभाजीच्या मोठय़ा तव्यावर ते पाव-पॅटीस तयार करतात. ब्रेड आणि बटाटय़ाच्या पॅटीसची चटकदार चव, लसणाची तिखट चटणी आणि भरपूर बटर यामुळे दोन पावांची एक प्लेट फस्त केल्यानंतर खवय्ये तृप्तीने ढेकर देताना दिसतात. तव्यावर शेकलेल्या, थोडय़ा तिखट चवीच्या पाव-पॅटीसची चव आजवर कुठेही न चाखलेल्या चवीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे हे नक्की. ती अशी शब्दांमध्ये सांगता येणार नाही, तिथे जाऊनच अनुभवावी लागेल.
म्हात्रे आजोबांनी जेव्हा हा पदार्थ सुरू केला तेव्हा ते १० रुपयांना दोन पाव-पॅटीस विकत असत. आज जवळपास दोन दशकांनंतरही या किमतीमध्ये फार तफावत आलेली नसून एक प्लेट पाव-पॅटिसची किंमत ४० रुपये आहे. एवढय़ा कमी किमतीविषयी म्हात्रे आजोबांना विचारले असता ते म्हणाले की, आमच्याकडे शाळा, क्लास आणि महाविद्यालयातील मुलं हा पदार्थ खायला येतात. त्यामुळे त्यांना ते परवडावं आणि शाळा-क्लास सुटल्यानंतर चांगला पदार्थ स्वस्तात खाता यावा यासाठी किंमत जेमतेमच ठेवण्यात आलेली नाही.
पाव पॅटीसचे यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लाल मिरच्यांच्या चटणीचे दोन प्रकार त्यांच्याकडे आहेत. एक लसणाची आणि दुसरी बिगर लसणाची. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तशी मागणी करू शकता. ब्रेड, बटाटे आणि जिरं, मोहरी, मिरच्यांची फोडणी हे सर्व एकजीव करून पॅटीस तयार केले जातात.
दुपारी साधारण एक-दीडच्या सुमारास सर्व तयारीला सुरुवात होते. स्टॉलवरील इतर पदार्थाच्या सोबतीने पाव पॅटीसची तयारीसुद्धा केली जाते. संध्याकाळी चार वाजता सुरू झालेला हा स्टॉल रात्री दहा वाजेपर्यंत सुरू असतो. तेही वर्षांचे बाराही महिने.
केवळ उभं राहूनच तिथेच न खाता अनेक जण हा पोट भरणारा पदार्थ घरी पार्सलही घेऊन जातात. त्या वेळी तो गरम राहावा आणि त्याचा ताजेपणा टिकावा यासाठी तो साध्या कागदामध्ये न बांधता सिल्वर फॉइलच्या बॉक्समध्येपॅक करून देण्यात येतो. त्यामुळे त्याचा आकारही तसाच राहून तुम्ही जसा तो तव्यावर पाहता तसाच घरी आणल्यावरही दिसतो. वाळाफलेला, तिखट, चमचमीत आणि ताजा.
कसे तयार होते पाव पॅटीस?
सर्वप्रथम पावभाजीच्या मोठय़ा तव्याच्या मध्यभागी लसणाची लालेलाल चटणी घेतली जाते. त्यामध्ये बटर टाकून या दोन्ही गोष्टी एकजीव केल्या जातात. त्यानंतर तव्याच्या कडेला ठेवलेले पॅटीस या चटणीमध्ये चांगले परतवून घेतले जातात. पॅटीसला तव्याच्या एका कडेला करून दहा ते बारा पाव मधून कापून दोन्ही बाजूंनी तव्यावरील चटणीवर पसरवले जातात. त्यानंतर तव्याच्या कडेला शेक घेत असलेला पॅटीस प्रत्येक पावावर ठेवला जातो. लालचुटूक टोमॅटोची एक गोलाकार चकती कापून ती पॅटीसवर ठेवली जाते. त्यावर बारीक चिरलेला कांदा टाकला जातो. त्याउपर हलकेचमिठाचा शिडकावा केला जातो. मग सर्व पाव दुमडले म्हणजेच बंद केले जातात. हे केल्यावर पावाच्या दोन-दोनच्या जोडय़ा करून तव्याच्या कडेला सरकवल्या जातात आणि पुन्हा एकदा लाल मिरच्या आणि लसणाची चटणी तव्याच्या मध्यभागी घेऊन त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बटर टाकलं जातं. या मिश्रणाला उकळी येईपर्यंत तव्याच्या कडेला असलेले पाव चार भागांत कापले जातात. एव्हाना पावसुद्धा गरम तव्यावर मस्तपकी शेकलेले असतात. चांगल्या पद्धतीने शिजलेल्या चटणीला पुन्हा एकदा काविलत्याने एकत्र केलं जातं आणि ते वाफाळलेलं मिश्रण चार भाग केलेल्या पावांच्या वरून पसरवलं जातं. पावाचे काप केलेले असल्यामुळे त्या भेगांमधून ते पावाच्या तळाशी पोहचतं. पुन्हा एकदा पावावर बारीक चिरलेला कांदा टाकला जातो. त्यावर बारीक शेव पसरवली जाते आणि शेवटी हिरव्यागार कोथिंबिरीची एक झालर पसरवून गरमागरम पाव पॅटीस कागदाच्या प्लेटमधून तुमच्या समोर सादर केलं जातं.

’ कुठे – डहाणूकरवाडी बस स्टॉपच्या शेजारी, डहाणूकरवाडी, कांदिवली (पश्चिम)
’ वेळ – संध्याकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत.
प्रशांत ननावरे