पदार्थ तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींवरूनही अनेकदा नेहमीच्या पदार्थाचा लुक आणि चवही बदलत असते. त्याहीपलीकडे काही पदार्थाची मांडणीही आपल्याला आकर्षति करते, कारण कुठलाही पदार्थ हा पहिल्यांदा डोळ्यांनी खाल्ला जातो आणि नंतर जिभेचे चोचले पुरवले जातात. फळांचं आइस्क्रीम हा तसा नवीन प्रकार नाही; पण ते बनवण्याची पद्धतच बदलल्याने रोलरकोस्टर आइस्क्रीम हे इतरांच्या तुलनेत वेगळं ठरतं. रोलरकोस्टर आइस्क्रीम वर्क्‍सचा तरुण मालक मंथन ठक्कर हा जेव्हा बेल्जियमला फिरायला गेलेला तेव्हा तिथे त्याने पहिल्यांदा हा प्रकार पाहिला. आतमधून उणे ३० अंश तापमान असलेल्या पाइपसदृश मशीनवर सतत बर्फ होण्याची प्रक्रिया सुरू होती आणि त्यावर दूध आणि फळाच्या संगमातून समोर ताजं आइस्क्रीम तयार केलं जात होत. मंथनला हा प्रकार आवडला आणि त्याने त्या मशीनचा भारतात शोध घ्यायला सुरुवात केली. गुजरातमध्ये त्याला ते मशीन सापडलं आणि दोन वर्षांपूर्वी घाटकोपरच्या खाऊगल्लीत रोलरकोस्टर आइस्क्रीम वर्क्‍सची सुरुवात झाली.

रोलरकोस्टर आइस्क्रीम प्रत्यक्ष समोर तयार होताना पाहणं हादेखील एक वेगळा अनुभव आहे. साधारण दोन फूट लांब आडव्या गोलाकार आणि एका विशिष्ट वेगात फिरणाऱ्या पाइपसदृश मशीनवर बर्फ तयार होण्याची प्रक्रिया निरंतन चालू असते. दर दोन तासांनी यावरचा बर्फ बदलण्यात येतो. मेन्यूवरील तुमच्या आवडत्या फ्लेवर्सच्या आइस्क्रीमची ऑर्डर दिल्यानंतर आइस्क्रीम बनवायला घेतले जाते. सर्वप्रथम बर्फाच्या मशीनवर एक वीतभर भाग निवडून त्यावर बर्फावर दूध घातले जाते. त्यानंतर तुम्ही ऑर्डर दिलेले फळ घेऊन त्या फळाचा गर ते गोल फिरणारे चाक शोषून घेईल अशा प्रकारे धरले जाते. या आइस्क्रीमसाठी फळांची निवड अतिशय बारकाईने करावी लागते, कारण फार कच्ची किंवा जास्त पिकलेली फळं घेऊन चालत नाही, कारण त्यावरच आइस्क्रीमची चव ठरते; पण अनुभवातून आता त्याचाही चांगलाच अंदाज आलेला आहे, असं मंथन सांगतो. गोल फिरणाऱ्या चाकावरील बर्फ आणि दुधामध्ये हा फळाचा गर एकजीव झाल्यावर छोटी किसणी घेऊन ती त्या चाकाला लावून त्याखाली छोटी प्लेट पकडली जाते. फिरणाऱ्या चाकावरील बर्फ, दूध आणि फळाचा गर या तीनही गोष्टी एकजीव होऊन तयार झालेलं आइस्क्रीम त्या प्लेटमध्ये उतरत असतं. कुठलाही आकार न घेता प्लेटमध्ये पडलेल्या वेडय़ावाकडय़ा नूडल्सच्या स्वरूपातील, दिसायला आकर्षक, त्या फळाचा रंग धारण केलेले आइस्क्रीम पाहूनच खरं तर गारेगार वाटतं; पण तुम्ही त्या आइस्क्रीमकडे फार काळ बघत राहू शकत नाही, कारण इतर आइस्क्रीमच्या तुलनेत ते फार लवकर वितळतं. शेवटी बर्फच तो. त्यामुळे हातात पडल्यापडल्या झटपट फोटो सेशन करून ते फस्त करावं लागतं. या आइस्क्रीमचं वैशिष्टय़ म्हणजे तुम्ही ऑर्डर दिलेल्या फळाचा रंग, चव आणि सुवास यामध्ये उतरलेला असतो. त्यामुळे आपण थंडगार फळंच एका वेगळ्या फॉर्ममध्ये खात असल्याचा अनुभव मिळतो.

चिकू, केळं, द्राक्ष, अननस, डािळब, मोसंबी, पपई, खरबुजा, किवी, सफरचंद, सीताफळ, लिची आणि जांभूळ या फळांचे आइस्क्रीम तुम्हाला रोलरकोस्टरवर तयार करून मिळतात. तसंच सीझननुसार मिळणाऱ्या आंबा, स्ट्रॉबेरी, किलगड या आइस्क्रीमलाही विशेष मागणी आहे. इथलं पेरूचं आइस्क्रीम फार प्रसिद्ध आहे. पेरूच्या आइस्क्रीमवर तिखट मसाला टाकल्यामुळे गोड-तिखट चवीच्या थंडगार आइस्क्रीमची लज्जत आणखी वाढते. सध्या आयपीएलचा हंगाम असल्याने त्या नावाचं आयपीएल कॉकटेल हे अनोखं आइस्क्रीमही येथे मिळतं. सर्व रसाळ फळांचा समावेश या आइस्क्रीममध्ये करण्यात आलेला आहे. मिक्स फ्रूटचे पर्यायही उपलब्ध आहेत. किवी-पायनॅपल-ऑरेंज हा त्यातील सर्वात पॉप्युलर फ्लेवर. फळांचा आणि चवीचा ताजेपणा टिकविण्यासाठी कोणतेही कृत्रिम फ्लेवर्स किंवा सिरप यामध्ये वापरले जात नाही. अपवाद केवळ रोझ आणि चॉकलेट सिरपचा.

शंभर ग्रॅमपेक्षा जास्त प्रमाण असलेल्या एका प्लेटची किंमत फळांची किंमत आणि उपलब्धतेनुसार साठ ते शंभर रुपयांच्या दरम्यान आहे. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट. तुमच्या डोळ्यादेखत तयार होणारं हे आइस्क्रीम तिथेच उभं राहून खावं लागतं, ते घरी घेऊन जाता येत नाही. त्यामुळे तुम्हाला या आइस्क्रीमचा आस्वाद घ्यायचा असेल तर घाटकोपरची खाऊगल्लीच गाठावी लागेल.

कुठे – शॉप क्रमांक १, टिप टॉप फरसानसमोर, वल्लभ बाग लेन (घाटकोपर खाऊगल्ली), घाटकोपर (पूर्व), मुंबई.

कधी – सोमवार ते रविवार संध्याकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत.