शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून १३ व्या दिवशीही विधान परिषदेचे कामकाज होऊ शकले नाही. विधान परिषदचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी वेलमध्ये उतरून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, अशी जेारदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यामुळे विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. अवघ्या एका मिनिटात परिषदेचे कामकाज तहकूब करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावरून १३ व्या दिवशी विरोधक आक्रमक झाले होते. त्याचे पडसाद सभागृहात उमटले. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, या मागणीसाठी विरोधक सभा सुरू होण्यापूर्वीच जमले होते. उपसभापती माणिकराव ठाकरे यांचे सभागृहात आगमन होताच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशी मागणी करीत गोंधळ घातला. याचवेळी सभागृहात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे निवेदन करण्यासाठी उभे राहिले. मात्र विरोधकांच्या गोंधळामुळे ते काहीही न बोलता आसनाजवळ उभेच होते. उपसभापती माणिकराव ठाकरे हे उभे राहूनच गदारोळ करणाऱ्या आमदारांना वेलच्या बाहेर जा, त्याशिवाय सभागृहाचे कामकाज सुरु करता येणार नाही, असे सांगत होते. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा गदारोळ सुरूच होता. सभागृहात गोंधळ सुरूच राहिल्याने उपसभापती ठाकरे यांनी विधान परिषद दिवसभरासाठी तहकूब केली.

विधानपरिषदेतील १२ आमदारांच्या निलंबनाची शक्यता

विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मांडताना गोंधळ घालणाऱ्या १९ आमदारांचे तात्पुरते निलंबन करण्यात आल्यानंतर आता विधानपरिषदेतील १२ आमदारांचे निलंबन करण्यात येणार होते, अशी चर्चा विधानभवनात आमदारांमध्ये सुरू होती. मात्र हा प्रस्ताव पटलावर येण्यापूर्वीच विरोधकांनी गेांधळ घातल्याने सभा तहकूब करावी लागली. गेल्या दोन दिवसांपासून विरोधक गेांधळ घालून कामकाज तहकूब होत असल्याने निलंबनाचा हा प्रस्ताव पटलावर येऊ शकलेला नाही, अशी कुजबूजही आमदारांमधून ऐकायला मिळत होती.