मुंबई : ‘साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही.. तुम्हीही लग्नाला या..’ असं आपुलकीचं आमंत्रण परभणी जिल्ह्य़ातील विठ्ठलराव गरुड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलं.. तर पहिल्यांदाच कर्जमुक्तीसाठी हेलपाटे मारावे लागले नाही, अशी भावना अहमदनगर जिल्ह्य़ातल्या पोपट मुकटे या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांजवळ व्यक्त केली.

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याचा आरंभ मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते सोमवारी झाला. त्यानिमित्त परभणी, अहमदनगर आणि अमरावती जिल्ह्य़ातील लाभार्थी शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांना विचारले की, या योजनेचा लाभ घेताना काही त्रास झाला का.. किती हेलपाटे मारावे लागले, किती कर्ज होते, कुठल्या पिकाला कर्ज घेतले होते.

आधीच्या आणि आताच्या कर्जमुक्ती योजनेमध्ये काय फरक जाणवला? त्यावर योजनेबाबत शंभर टक्के समाधानी असल्याची भावना अहमदनगर जिल्ह्य़ातील पोपट मुकटे यांनी व्यक्त करताना ‘मागील वेळेस पाच ते सहा वेळा चकरा माराव्या लागल्या. आता केवळ एका अंगठय़ावरच काम झाले,’ असे त्यांनी सांगितले.

परभणीच्या पिंगळी येथील विठ्ठलराव गरुड यांनी कर्जमुक्तीची रक्कम मिळणार असल्याने चिंता मिटल्याची भावना व्यक्त केली आणि मुलीचे लग्न जमले आहे, अशी आनंदाची बातमी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिली. त्यावर पवार यांनी त्यांची विचारपूस करून लेकीला आणि जावयाला लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या. तेव्हा गरुड यांनी लगोलग दोघांना मुलीच्या लग्नाचे आमंत्रणही दिले.