News Flash

शेतकऱ्यांची कुटुंबव्यवस्था बिघडली, विवाह लांबले!

गावात राहणाऱ्या तरुणांची लग्ने रखडल्याचे दिसून आले आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र

सामाजिक सर्वेक्षणात निष्कर्ष

शेतीमालाला भाव नाही, दुष्काळ, कर्जमाफी हे शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित विषय ऐरणीवर असतानाच शेती करणाऱ्या तरुणांची लग्नेही रखडल्याने गेल्या चार-पाच वर्षांत कुटुंब व्यवस्थाही उद्ध्वस्त होत चालल्याचे भीषण वास्तव सामाजिक सर्वेक्षणात पुढे आले आहे. अहमदनगर जिल्ह्य़ातील ४५ गावांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात विवाह रखडलेले तीन हजार ६८ तरुण आढळून आले. शेती करणाऱ्या तरुणाशी विवाह करण्यापेक्षा शहरात नोकरी करणाऱ्या तरुणांशी विवाह करण्याकडे शेतकरी कुटुंबांमधील मुलींचा कल आहे. त्यामुळे गावात राहणाऱ्या तरुणांची लग्ने रखडल्याचे दिसून आले आहे.

आपल्या मुलीचा विवाह शेतकरी तरुणाशी करायचा नाही, अशी मानसिकता आईवडिलांची आणि मुलींचीही भूमिका आहे. मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढत असल्याने मुली शहरातील नोकरदार तरुणांना विवाहासाठी प्राधान्य देत असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. त्यामुळे अनेक तरुण सिन्नर, चाकण येथील कारखान्यात विवाह जमेपर्यंत नोकरी मिळवायची धडपड करीत आहेत. पिंपळगाव देपा येथील ज्ञानेश्वर उंडे यांनी दर वर्षी १०० हून अधिक लग्ने जमविली. मात्र गेल्या तीन वर्षांत मुलांचे वडील त्याच्याकडे हेलपाटे मारत असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले. सोलापूर, पुणे जिल्ह्य़ातील १० गावांमध्येही ३१९ तरुणांची लग्ने रखडल्याचे आढळून आले. विवाह रखडल्याने या तरुणांना नैराश्य येत असून ते व्यसनाधीन होत असल्याचेही दिसून येत आहे.

सततचा दुष्काळ, शेतीमालाला चांगला दर मिळत नाही, उत्पन्न कमी यातून ही भीषण सामाजिक परिस्थिती निर्माण झाली असून केवळ कर्जमाफीसारख्या उपायांनी ती बदलणार नाही, असा या संस्थेचा निष्कर्ष आहे.

  • सामाजिक व शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेने नगर जिल्ह्य़ातील अकोले व संगमनेर तालुक्यातील ४५ गावांमध्ये सर्वेक्षण केले.
  • या गावांमध्ये २५ ते ३० वयोगटातील २२९४ तर ३१ ते ४० वयोगटातील ७७४ तरुणांचे विवाह रखडले आहेत. एमबीए झालेले चार तरुण शेती करीत असल्याने विवाह रखडले आहेत.
  • तिशी उलटलेल्या तरुणांनी तर विवाहाची आशाच सोडून दिली आहे. काही गावांमध्ये विवाह रखडलेले २५० ते ३०० तरुण आहेत.
  • केवळ अल्प भूधारकच नाही, तर १० एकर जमीन असलेल्या कुटुंबांमध्येही विवाह रखडले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 3:47 am

Web Title: farmer debt waiver issue farmer family issue
Next Stories
1 हिंदीविरोधी प्रादेशिक पक्षांच्या बैठकीला मनसेचे नेते
2 भाजपचे गोडवे गाणाऱ्या विखे यांना काँग्रेसची समज!
3 मंजुळाला मारहाण करण्यासाठी कोणी प्रवृत्त केले?
Just Now!
X