ठाणे जिल्ह्य़ातील पालघर तालुक्यात कारले पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिएकरी ३० हजार रुपये याप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येणार असून बनावट बियाणे देऊन  शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
पालघर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कारल्याची लागवड केली होती. मात्र त्यासाठी कंपन्यांकडून घेण्यात आलेले बियाणे निकृष्ट असल्याने शेतकऱ्यांचे मोठय़ाप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बठक आयोजित करण्यात आली होती. सुमारे ३८.०६ हेक्टर क्षेत्रावर १५९ शेतकऱ्यांनी कारल्याची लागवड केली होती.
या लागवडीकरिता आकाश, अभिषेक, कोहीनूर, छाया, अमनश्री, काव्या, यु.एस. ४७५ या नावाने व्ही.एन.आर. सीड्स, मॉन्सँटो होल्डींग प्रा.लि., इंडो-अमेरिकन हायब्रीड सीड्स, ईस्ट-वेस्ट सीड्स इंडिया प्रा.लि., नन्हेन्स इंडिया प्रा.लि., नोबेल सीड्स प्रा.लि. आणि सीड वर्कर्स इंडिया प्रा.लि. या कंपन्यांच्या बियाणांचा वापर शेतकऱ्यांनी केला होता. त्यामुळे झालेल्या नुकसानीपोटी संबधित शेतकऱ्यांना एकरी ३० हजार रुपये याप्रमाणे मदत देण्याचे कंपन्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे नुकसानापोटी शेतकऱ्यांना एकूण २८.२१ लाख मिळणार आहेत. या कंपन्यांच्या कृतीची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून कृषी विभागाने चार कंपन्यांचे विक्री परवाने निलंबित केले आहेत. तसेच उर्वरित प्रमुख दोन कंपन्यांचे परवाने रद्द करून सर्व सहा कंपन्यांविरुद्ध पालघर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती विखे-पाटील यांनी दिली.
या बठकीला कृषी आयुक्त उमाकांत दांगट, कृषी संचालक निविष्ठा व गुणनियंत्रण डॉ. सुदाम अडसूळ, ठाणे विभागाचे कृषी सहसंचालक विजय इंगळे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रफिक नाईकवाडी आणि संबंधित बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.