देशाचे माजी कृषी मंत्री असलेले राज्यातील नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायम जागरुक असतात. म्हणूनच ते शेतकऱ्यांचे नेते म्हणूनही ओळखले जातात. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून गेल्याचे त्यांना आपण अनेकदा पाहिले आहे. शेतकऱ्यांबद्दल पवारांना जितका जिव्हाळा आहे तेवढेच त्यांच्यावर प्रेम करणारे शेतकरीही आहेत. अशाच एका शेतकऱ्याने प्रेमापोटी २०० किमीची बाईकस्वारी करीत शरद पवारांना मदत केली आहे. या शेतकऱ्याच्या अमुल्य मदतीबद्दल पवारांनीही त्याचे आभार मानले आहेत.

सुनील सुक्रे असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातल्या केंदूर गावचा तो रहिवासी आहे. या शेतकऱ्याने शरद पवारांच्या प्रेमाखातर त्यांना शिरुर ते मुंबई असा २०० किमी दुचाकीवरुन प्रवास करीत भाजीपाला पोहोच केला आहे. सामान्य शेतकऱ्यांच्या या प्रमामुळे सहाजिकच भारावलेल्या शरद पवारांनी त्याच्यासोबत फोटो काढून घेतला आणि तो ट्विटरच्या माध्यमातून शेअर करीत त्याचे कौतुक केले.

शेतकऱ्यांचे प्रेम हीच आपली शक्ती – शरद पवार</strong>

या शेतकऱ्याचे कौतुक करताना शरद पवारांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रेम हीच माझी शक्ती आहे, असे शरद पवारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.