नव्या जमीन अधिग्रहण कायद्यान्वये शेतकऱ्यांच्या जमिनीस बाजारभावापेक्षा चौपट मोबदला मिळेल, अशी ग्वाही केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी नेरुळ येथील एका कार्यक्रमात दिली. यासंदर्भातील कायदा पुढील आठवडय़ात संसदेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. नवी मुंबई महापालिकेने नेरुळ येथील वंडर पार्क तसेच ई-लायब्ररी सुविधांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.
शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबतच्या वादाबद्दल बोलताना, स्मारकाबाबत जबरदस्ती करू नये, असा सल्ला त्यांनी दिला.  
विकास प्रकल्प राबविताना शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यावे लागणे अपरिहार्य ठरते. मात्र जमिनी घेताना भूमिपुत्र उद्ध्वस्त होणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. नव्या कायद्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीची किंमत वाढवून मिळेल. तसेच सार्वजनिक सुविधांसाठी जमीन संपादित करण्याचा अधिकार केंद्र आणि राज्य शासनाकडे असेल, असे नमूद करतानाच, नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ज्यांच्या जमिनी संपादित व्हायच्या आहेत, त्यांना नव्या कायद्यानुसार बाजारभावाच्या चौपट दर मिळेल, असेही त्यांनी सांगितले. या नव्या कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात स्थिरता निर्माण होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. नागपूर येथील राज्याच्या हिवाळी अधिवेशन सध्या असलेल्या गोंधळाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. कोणत्याही विषयावर चर्चाच होऊ द्यायची नाही, ही विरोधकांची भूमिका योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव, पालकमंत्री गणेश नाईक, आमदार संदीप नाईक आदी या वेळी उपस्थित होते.
वन्यप्राण्यासोबत माझेही छायाचित्र
शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांनी वन्यप्राण्यासोबत काढलेल्या छायाचित्राच्या वादास फारसे महत्त्व देण्याची गरज नाही. परदेशात हॉटेलमध्ये असे अनेक भुसा भरून ठेवलेले प्राणी असतात. हौसेने अनेक लोक त्यांच्यासोबत छायचित्रे काढतात. मीसुद्धा असे छायाचित्र काढले आहे, असेही शरद पवार यांनी या वेळी सांगितले.