01 March 2021

News Flash

पवारांच्या दबावतंत्राने जाधव नाराज

लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळात फेरबदल करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या धक्क्यामुळे माजी नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव कमालीचे नाराज झाले आहेत. पक्षश्रेष्ठींचा निर्णय आपल्याला

| June 12, 2013 03:49 am

लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळात फेरबदल करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या धक्क्यामुळे माजी नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव कमालीचे नाराज झाले आहेत.
पक्षश्रेष्ठींचा निर्णय आपल्याला मान्य असून आपली कसलीही तक्रार नसल्याचे जाधव आपल्या समर्थकांना सांगत असले तरी आपल्या कट्टर विरोधकाला मंत्रिपद देण्यात आल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. तर बबनराव पाचपुते यांना शेतकऱ्यांची नाराजी भोवल्याचे सांगितले जात आहे.
 राष्ट्रवादीने मंत्रिमंडळात केलेल्या फेरबदलावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे. ज्या सहा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे, त्यापैकी सर्वात धक्कादायक बाब ठरली आहे ती भास्कर जाधव यांच्याबाबत.
आपल्याला मंत्रिमंडळातून वगळले गेल्याची बातमी जाधव यांना सकाळी थेट प्रसारमाध्यमांतून कळली. या धक्यातून ते सावरत असतानाच त्यांचे कट्टर विरोधक उदय सांमत यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाची वार्ता जाधव यांच्यापर्यंत पोहोचली. आपल्या विरोधकाला मंत्री केल्यामुळे जाधव कमालीचे संतप्त झाले असून त्यांनी आपली नाराजी वरिष्ठांच्या कानावर घातल्याचे सूत्रांनी सांगितले.
पक्षाने आपल्याला मंत्री केले तेव्हा का केले असेही विचारले नाही त्यामुळे आता मंत्रिपद का काढले असे विचारण्याचा मला हक्क नसून पक्ष श्रेष्ठींचा निर्णय मान्य आहे, आपण कोणावरही नाराज नाही, असे भास्कर जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
मात्र जलसंपदामंत्री सुनिल तटकरे यांनीच आपला बळी घेतल्याचा जाधव यांचा समज असून चिपळूणला गेल्यावरच ते आपली भूमिका उघड करणार असल्याचेही त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. त्यामुळे आता भास्कर जाधव पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयानंतर कोणते पाऊल उचलतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, भास्कर जाधव यांना पक्षांतर्गत राजकारणाचा फटका बसला असला तरी आदीवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते यांना मात्र त्यांच्याच विभागातील शेतकऱ्यांच्या फसवणुकीची किंमत मोजावी लागल्याचे समजते.

चिपळूणला गेल्यावर भूमिका स्पष्ट करणार
जलसंपदामंत्री सुनिल तटकरे यांनीच आपला बळी घेतल्याचा जाधव यांचा समज असून चिपळूणला गेल्यावरच ते आपली भूमिका उघड करणार असल्याचेही त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. त्यामुळे आता भास्कर जाधव पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयानंतर कोणते पाऊल उचलतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मंत्रिपदाचा मुकुट..
* मधुकरराव पिचड – आदिवासी समाजातील पिचड हे ज्येष्ठ नेते. लोकशाही आघाडी सरकारच्या पहिल्या डावात (१९९९-२००४) मंत्रिपद मिळाले तरी २००४ आणि २००९ मध्ये त्यांचा मंत्रिपदाकरिता विचारच झाला नाही. अडगळीत पडलेल्या पिचड यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपावून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले. यापुढे निवडणूक लढविणार नाही असे जाहीर केलेल्या पिचड यांनी मंत्रिपद मिळावे, अशी इच्छा पवारांकडे व्यक्त केली होती.

* शशिकांत शिंदे – सातारा जिल्ह्य़ातील अजित पवार यांचे निकटवर्तीय. खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी राजकीय टक्कर देण्याकरिता शिंदे यांच्या डोक्यावर मंत्रिपदाचा मुकुट देण्यात आला. खासदार भोसले हे राष्ट्रवादीकडून लढणार नाहीत हे जवळपास निश्चित असल्याने शिंदे यांना त्यांच्या विरोधात िरंगणात उतरविले जाण्याची शक्यता. त्यासाठीच राजकीय ताकद देण्यात आली. माथाडी कामगारांचे नेते तसेच सभागृहात आक्रमक अशी प्रतिमा. अजितदादांच्या शब्दाबाहेर नाहीत हा त्यांच्यासाठी फायदेशीर मुद्दा.

दिलीप सोपल – बार्शी मतदारसंघातून अपक्ष निवडून येऊनही राष्ट्रवादीचे मंत्रिपद. लिंगायत समाजातील सोपल यांचा समावेश उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून करण्यात आला असावा. कारण डॉ. पद्मसिंह पाटील हे मराठा तर सोपल हे मागासवर्गीय असे सामाजिक समीकरण साधून हा मतदारसंघ कायम राखण्याचा प्रयत्न.  हजरजबाबी आणि मिश्कील म्हणून प्रसिद्ध असलेले सोपल हे सभागृहातील ‘अशांत टापू’चे नेते मानले जातात.

* सुरेश धस – २००४च्या निवडणुकीत भाजपच्या वतीने निवडून आले तरी धस हे मनाने राष्ट्रवादीबरोबर होते. २००९ मध्ये राष्ट्रवादीतून निवडून आल्यापासून मंत्रिपदाकरिता ते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्यानेच महानंदचे अध्यक्षपद मिळाले. अत्यंत आक्रमक अशी प्रतिमा असलेले धस हे कायम वादग्रस्त ठरले आहेत. अलीकडेच बँकेच्या व्यवस्थापकाला मारहाण केल्याबद्दल त्यांना अटक झाली होती. राज्यमंत्रिपदाची हवा डोक्यात गेल्यास राष्ट्रवादीला त्रासदायक ठरू शकतात.

* उदय सामंत – रत्नागिरीमधून दोनदा निवडून आलेले सामंत हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष असून, खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय समजले जातात. भास्कर जाधव यांना वगळल्याने कोकण किंवा रत्नागिरीला प्रतिनिधीत्व देण्याच्या उद्देशानेच सामंत यांना संधी मिळाली आहे. जाधव यांच्यासारखे आक्रमक नाहीत किंवा राजकीय प्रभाव कितपत पाडू शकतात याबाबत मात्र साशंकता.

* संजय सावकारे – जळगावमधील गुलाबराव देवकर यांना वगळण्यात आल्याने जिल्ह्य़ाला प्रतिनिधीत्व देण्याच्या उद्देशानेच सावकारे यांना संधी मिळाली. राज्यसभेचे खासदार ईश्वर जैन हे मनाने राष्ट्रवादीबरोबर राहिलेले नाहीत. अशा वेळी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ातील लाल दिव्याची गाडी सावकारे यांच्या रुपाने कायम ठेवण्यात आली.

घरचा रस्ता..
* बबनराव पाचपुते – बिगर आदिवासी नेत्याकडे आदिवासी विकास हे खाते सोपविण्याचा पक्ष नेतृत्वाचा निर्णयच मुळात चुकीचा होता. परिणामी खात्यावर काहीच प्रभाव पाडू शकले नाहीत. आदिवासी समाजात डीएनए चाचणी झाली पाहिजे, असे मत मांडल्याने आधीच वादग्रस्त ठरले होते. नगरसारख्या राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या जिल्ह्य़ातही ठसा उमटवू शकले नाहीत. आगामी लोकसभा निवडणूक नगरमधून लढविण्याच्या तयारीत.

* रामराजे नाईक-निंबाळकर – पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे असले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फारसे सख्य नव्हते. अजितदादांची नाराजीच रामराजेंना भोवली. अन्य काही खात्यांप्रमाणे कृष्णा खोरे खात्यात थेट हस्तक्षेप करणे अजितदादांना निंबाळकर यांच्यामुळे शक्य होत नव्हते, अशी चर्चा आहे. कृष्णा खोऱ्यातील प्रकल्पांसाठी जास्तीत जास्त निधी मिळावा म्हणून नेहमीच विविध क्लुप्त्या योजण्यात पुढाकार असे. शरद पवार यांनी जाहीर केल्याप्रमाणे ते माढा मतदारसंघातून लढणार नसल्यास या मतदारसंघातून लढण्याची तयारी.

प्रा. लक्ष्मण ढोबळे – सोलापूर जिल्ह्य़ातील विजयसिंह मोहिते-पाटील व त्यांच्या घराण्याची सद्दी संपविण्याकरिता पक्षाने ढोबळे यांना ताकद दिली. यापूर्वी मंत्री म्हणून अयशस्वी ठरले असतानाही केवळ सोलापूरच्या राजकारणाकरिता त्यांचा उपयोग करून घेण्यात आला. पाणीपुरवठा खात्यातही फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. उलट विविध ठिकाणी वादच निर्माण केले. दुष्काळावरून त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून अजितदादांनी त्यांचा जाहीरपणे पाणउतारा केला होता. पक्ष संघटनेत उपयोग करून घेतला जाण्याची शक्यता.

* भास्कर जाधव – कोकणात नारायण राणे आणि सुनील तटकरे या दोन दिग्गज नेत्यांना एकाच वेळी भिडण्याचे धारिष्ट दाखविले. मुलाच्या लग्नाच्या वेळी केलेली भपकेबाजीवरून शरद पवार यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली व रात्री झोप लागली नाही, असे विधान केले तेव्हाच जाधव यांचे दिवस भरत आल्याचे अनुमान काढण्यात आले होते. तटकरे यांच्याशी घेतलेला पंगाही त्यांना नडला.  गेल्या वर्षी नगरपालिका निवडणुकीत स्वत:च्या गावात राष्ट्रवादीच्या विरोधात पॅनल उभे करण्याचे धाडस केले होते. हे सारेच जाधव यांच्यासाठी तापदायक ठरले.

* गुलाबराव देवकर – राजकीयदृष्टय़ा कमकुवत फक्त जळगावच्या राजकारणात सुरेश जैन यांना शह देण्याकरिता राज्यमंत्रीपद मिळाले. राज्यमंत्री म्हणूनही फारसे प्रभावी ठरले नाहीत. जळगावमधील घरकुल घोटाळ्यात अडकल्याने बदनाम झाले. अटक होणे किंवा कोर्टात आरोपपत्र दाखल झाल्यावरही देवकर यांना राष्ट्रवादी पाठीशी घालत असल्याने टीका होत होती. देवकर यांना घरचा रस्ता दाखवून राष्ट्रवादीने स्वत:ची सुटका करून घेतली आहे.

* प्रकाश सोळंके – गेल्या वेळी भाजपच्या वतीने निवडून आलेले सोळंके हे २००९च्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले आणि राज्यमंत्री झाले. बीडच्या राजकारणात भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना शह देण्याकरिता तसेच मराठा मतांचे धुव्रीकरण करण्याच्या उद्देशाने सोळंके यांना संधी देण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2013 3:49 am

Web Title: farmer minister bhaskar jadhav unhappy over sharad pawar pressure system
Next Stories
1 राज ठाकरेंच्या विरोधातील वॉरंट स्थानिक न्यायालयाकडून रद्द
2 मराठेतर मतांसाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी
3 आता ‘एसआयटी’ चौकशी?
Just Now!
X