मुंबई : महाविकास आघाडी सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना फसवी असून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा आणि मच्छिमारांसाठी मत्स्य दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत सोमवारी केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आजही सुरू असून, त्यांना दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

विधानपरिषदेमध्ये विरोधकांकडून मांडण्यात आलेल्या चर्चेच्या प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी सरकराच्या कर्जमाफी योजनेवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, सरकार संवेदनाहीन झाले असून त्यांना शेतकऱ्यांचे सोयरसुतक राहिलेले नाही. सरकार स्थापन होण्याच्या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले, मात्र सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. कर्ज माफी देत असतानाही शेतकरी आत्महत्या करत आहेत, ही बाब अस्वस्थ करणारी आहे ते म्हणाले.