शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून ‘पीककर्ज, पाणी आणि कृषीपंपासाठी वीज’ या त्रिसूत्रीबरोबरच समुपदेशनाच्या माध्यमातून त्यासाठी पावले टाकली आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मात्र प्रयत्नांचे फलित दिसण्यासाठी काही कालावधी लागेल. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याने दु:खी व चिंतित आहे, मात्र निराश झालेलो नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, यवतमाळ येथील शेतकऱ्याच्या पत्नीला शासनाने मदत करूनही त्या पतीनिधनामुळे वैफल्यग्रस्त असल्याने त्यांनी आत्महत्या केली, अशी माहिती उच्चपदस्थांनी दिली.
गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असून सावकाराची कर्जमाफी, पीककर्जाचे पुनर्गठन यासह अनेक उपाययोजना सरकार करीत असतानाही आत्महत्या थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी िपपरी (ता. – यवतमाळ) गावात जाऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीचे सांत्वन केले आणि तरीही त्यांनी आत्महत्या केली. शासनाच्या उपाययोजना तोकडय़ा पडत असल्याचे दिसून येत असून जलयुक्त शिवार आणि जलसंधारणाच्या अनेक उपाययोजनांचे फलित दिसेपर्यंत काही वर्षांचा कालावधी लागणार आहे.

पीककर्जासाठी प्रयत्न
यासंदर्भात सरकारची भूमिका मांडताना मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांना दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट आदींमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्यात आली आहे. पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत. पीककर्जाचे पुनर्गठन करण्यात येत असून वर्षभरासाठी त्यांना हप्ते भरावे लागणार नाहीत आणि व्याजाचा भार सरकार पेलणार आहे. यंदाच्या हंगामासाठी प्रत्येक शेतकऱ्याला पीककर्ज मिळावे, यासाठी पावले टाकण्याच्या सूचना नुकत्याच झालेल्या बैठकांमध्ये देण्यात आल्या आहेत. विहिरी खोदण्यासह वेगवेगळ्या माध्यमांतून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कामे सुरू आहेत. पाणी उपलब्ध झाल्यावर कृषीपंपांसाठी वीजही दिली जाणार आहे.