मुंबई : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ मुंबईत किसान अलायन्स मोर्चाच्या वतीने मरिन लाइन्सजवळील इस्लाम जिमखानापासून आझाद मैदान असा मोर्चा शनिवारी काढण्यात आला. मुंबई शहरातून शेकडो सामान्य नागरिकांनी मोर्चात सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. तसेच कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली.

केंद्र सरकारने लागू केलेले कायदे हे अन्यायकारक असून बड्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी आणल्याचा आरोप यावेळी आंदोलनकत्र्या नागरिकांनी केला. मोर्चात सुमारे अडीच ते तीन हजार नागरिक सहभागी झाले होते. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. शिख बांधवही मोठ्या संख्येने सामील झाले होते.

‘शेतकरी बांधव एकटे नसून शहरातील नागरिकही त्यांच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळेच मुंबईमधील नागरिकांनी देशभरातील आंदोलनकत्र्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ हा मोर्चा काढला. येत्या २६ जानेवारीपर्यंत सरकारने हे काळे कायदे मागे घेतले नाहीत, तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल,’ असा इशारा लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी दिला. मोर्चामुळे पोलिसांनी काही काळासाठी वाहतूक थांबविली होती. आंदोनलानंतर मोर्चातील प्रतिनिधी मंडळाने राज्यपालांना मागण्यांचे निवदेन दिले.

आंदोलनात निवृत्त न्या. बी. जे. कोळसे पाटील, शेतकरी नेते राजू शेट्टी,  सामाजिक कार्यकत्र्या तिस्ता सेटलवाड, मेधा पाटकर, वर्षा विद्या विलास, समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी आदी उपस्थित होते. त्याचबरोबर सिंघू बॉर्डरवरून आलेले शेतकरी नेते अमरजीत सिंग आणि जगबीर चौहान आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी किसान अलायन्स मोर्चा, लोक संघर्ष मोर्चा, हम भारत के लोग, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अमन कमिटी, घर बचाओ घर बनाओ, सिटिझन फॉर जस्टीस अँड पीस आणि आम आदमी पार्टी आदी संस्था संघटना सहभागी झाल्या होत्या.