16 November 2018

News Flash

‘लाभार्थी’च्या लाभाला लगाम?

कर्जमाफी किंवा प्रोत्साहन अनुदानापैकी एकच लाभ ग्राह्य़

प्रतिनिधिक छायाचित्र

कर्जमाफी किंवा प्रोत्साहन अनुदानापैकी एकच लाभ ग्राह्य़

राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जमाफीच्या योजनेत आता आणखी  सुधारणा करण्यात आली आहे. नियमित व संपूर्ण कर्जफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना कर्जफेड केलेल्या एकूण रकमेच्या २५ टक्के किंवा २५ हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता एका कुटुंबाला कर्जमाफी किंवा प्रोत्साहनपर अनुदान यापैकी एकाच लाभासाठी पात्र धरण्यात येणार आहे. एका वर्षांत कर्जफेड आणि दुसऱ्या वर्षांत थकबाकी असणाऱ्यांना दोन्ही लाभ मिळू नयेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा सहकार विभागातील सूत्रांनी केला असला तरी हा ‘लाभार्थी’च्या लाभाला लगामच असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ ही योजना जाहीर केली. त्याअंतर्गत दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या त्याची अंमलबजावणी सुरु आहे. मात्र किती शेतकरी लाभार्थी आहेत आणि नेमकी किती कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे, याबाबत दररोज वेगवेगळे आकडे पुढे येत आहेत. ज्या शेतकऱ्यांना काही कारणाने कर्जफेड करता आली नाही, त्यांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार, मग जे शेतकरी प्रामाणिकपणे व नियमितपणे कर्जफेड करतात, त्यांचे काय असा प्रश्न उपस्थित केला गेला. त्यावर, ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्जफेड केली आहे, त्यांना प्रोत्साहन म्हणून कर्जाच्या २५ टक्के किंवा २५ हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ज्यांची मोठी कर्जे होती, त्यांना त्याचा अधिक लाभ मिळणार. परंतु लहान कर्जदारांना कमी फायदा मिळणार आहे. १५ हजार रुपयांपेक्षा कमी कर्जफेड केली असेल, तर तेवढीच रक्कम त्यांना प्रोत्साहन म्हणून देण्यात येणार आहे.

याआधी नियमित व प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी व प्रोत्साहनपर दीड लाख रुपयापर्यंत एकत्रित लाभ देण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे २०१५-१६ मध्ये संपूर्ण कर्जफेडीवर २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ घ्यायचा आणि २०१६-१७ मध्ये थकित कर्ज माफ करून  घ्यायची, असे दोन्ही लाभ घेतले जाण्याचा धोका होता. असे दुहेरी लाभ दिले जाऊ नयेत, यासाठी हा बदल केल्याचे सूत्रांनी सांगितले. आता या योजनेंतर्गत एक कुटुंब कर्जमाफी किंवा प्रोत्साहनपर रक्कम यापैकी एकाच लाभासाठी पात्र धरले जाणार आहेत. त्यासाठी या योजनेत आता सुधारणा करण्यात आली आहे. २०१५-१६ या वर्षांत घेतलेल्या कर्जाची संपूर्ण परतफेड केली असल्यास आणि त्यानंतर २०१६-१७ मध्ये घेतलेल्या कर्जाची ३१ जुलै २०१७ पर्यंत परतफेड केली असल्यास आधीच्या वर्षांतील कर्जाच्या २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांचा प्रोत्साहन म्हणून लाभ दिला जाणार आहे. म्हणजे सलग दोन वर्षांतील कर्जफेड केली असेल, तर एका वर्षांच्या कर्जावर प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे.

४१ लाख शेतकऱ्यांसाठी १९ हजार कोटी मंजूर

कर्जमाफी योजनेंतर्गत आतापर्यंत ४१ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी १९ हजार ५३७ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कर्जमाफीसाठी मंजूर करण्यात आलेली रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग करावी अशा सूचना मुख्यंत्र्यांनी बँक प्रतिनिधींना दिल्या आहेत.

First Published on December 8, 2017 2:33 am

Web Title: farmers are in a very bad condition in maharashtra 2