19 January 2021

News Flash

शेतकऱ्यांना घरबसल्या एकाच अर्जावर विविध योजनांचा लाभ

विकसित तंत्रज्ञानाची जोड प्रयोगशील शेतकऱ्याला दिली तर कमी जागेत भरपूर उत्पादन घेणे शक्य

संग्रहित छायाचित्र

शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ केवळ एकाच ऑनलाइन अर्जावर देणाऱ्या महाडीबीटी पोर्टलमुळे मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याला माहिती तंत्रज्ञानाची साथ मिळाली आहे. करोना संकट काळात सगळ्यांनाच ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा असताना शेतकरी मात्र शेतात राबून संपूर्ण जगाला अन्नधान्य पुरवतो आहे. त्यामुळे या अन्नदात्याला अधिक बळ देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  केले.

कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व कृषीमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत महाडीबीटी पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला. शेतीक्षेत्रातही बाजारपेठ संशोधन महत्त्वाचे आहे, त्यामुळे जे विकेल तेच पिकेल या पद्धतीने पिकांचे नियोजन करून राज्यभरातील शेतकऱ्यांना एका छताखाली आणा. यासाठी विभागवार पद्धतीने पिकांचे नियोजन करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. महाडीबीटी पोर्टलमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या एकाच अर्जावर विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. विकसित तंत्रज्ञानाची जोड प्रयोगशील शेतकऱ्याला दिली तर कमी जागेत भरपूर उत्पादन घेणे शक्य होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गडचिरोलीच्या अनिल एलावार या शेतकऱ्याने विषमुक्त शेतीचे महत्त्व पटवून देताना सेंद्रिय शेतीतून उत्पादित केलेल्या शेतमालाला मुंबईत विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची केलेली मागणी आपण तत्काळ मान्य करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कमी जागेत अधिक उत्पादन घेणारे, अत्याधुनिक पद्धतीने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून शेती करणारे शेतकरी आपल्याकडे आहेत. त्यांच्या या मेहनतीला शाश्वती देण्याचे काम करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असेही त्यांनी सांगितले.

तर नव्या व्यवस्थेमुळे शेतकऱ्याला सर्व योजनांचा लाभ घरी मिळणार आहे. करोना काळात शेतकऱ्यांना बांधावर खते पुरविली गेली त्याचे शेतकऱ्यांनी स्वागत केले. मात्र बोगस बियाण्यांबाबत आलेल्या तक्रारींवर कारवाई करताना मुळावरच घाव घालावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.

राज्यात ७६ टक्के पेरणी पूर्ण

पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ या त्रिसूत्रीवर आधारित कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील २३ हजार ५०६ गावांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. शेतीत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांची रिसोर्स बँक तयार केली असून त्यात ३६०६ शेतकऱ्यांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांसाठी कौशल्य आधारित प्रशिक्षण सुरू करण्यात येणार असल्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. राज्यात आतापर्यंत १४१.९९ लाख हेक्टर क्षेत्रापैकी १०७. ४८ लाख हेक्टर क्षेत्रावर (७५.७० टक्के) पेरणी पूर्ण झाल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 12:17 am

Web Title: farmers benefit from various schemes on a single application at home abn 97
Next Stories
1 मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेस दोन वर्षे मुदतवाढ
2 राज्यातील वीजग्राहकांना व्याजमुक्ती, पण मुंबईकरांवर व्याजाचा भुर्दंड
3 वंदेभारत अभियान- २१४ विमानांमधून ३२ हजार ३८३ प्रवासी मुंबईत दाखल
Just Now!
X