केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास दीड महिन्यापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास आता महाराष्ट्रतील शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर आज अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात नाशिक येथून निघालेले हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत.

येथील आझाद मैदानात या आंदोलक शेतकऱ्यांनी आज मुक्का ठोकला आहे. या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यता आलेला आहे. तर, उद्या राजभवनावर हे शेतकरी मोर्चा नेणार आहेत. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील शेतकरी मोठ्या संख्येने या महामोर्चात सहभागी झालेले आहेत.

संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या झेंड्याखाली राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेतकऱ्यांना उद्या(२५ जानेवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे संबोधित करणार आहेत.

आझाद मैदानात शेतकऱ्यांचे तीन दिवसांचे धरणे आंदोलन असणार आहे. या शेतकरी आंदोलनास महाविकासआघाडी सरकारचा पाठिंबा आहे. आंदोलक शेतकऱ्यांसाठी मैदाना भव्य मंडप उभारण्यात आलेला आहे. आंदोलक शेतकरी राज्यपालांना निवेदन सादर करणार आहेत.  शिवाय, २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी आझाद मैदाना ध्वजारोहणही केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.