06 March 2021

News Flash

शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, आम्ही राज्यकर्त्यांचे जिणे हराम करू: शरद पवार

पनवेलमध्ये संघर्ष यात्रेचा समारोप

शरद पवार

शेतकऱ्यांनो तुम्ही आत्महत्या करू नका. आम्ही या राज्यकर्त्यांचे जीणे हराम करू, असा निर्धार व्यक्त करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. शेतकरी कर्जमाफीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसह इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेचा समारोप पनवेलमध्ये झाला. समारोपाच्या भाषणात पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या. आता आंदोलन थांबणार नाही. सरकारने लोकभावनेचा विचार करावा. महाराष्ट्रातील भाजप सरकारला शेतकरी इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असेही शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करत आहे. पण या सरकारला लाज वाटत नाही. या भाजप सरकारला वेगळ्या प्रकारे धडा शिकवायला हवा, असेही ते म्हणाले. आत्महत्या करू नका, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अजित पवार यांनीही राज्य सरकारवर तोफ डागली. येत्या तीन दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अन्यथा विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे. दरम्यान, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देण्यात यावी. सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. उत्तर प्रदेश सरकारने तेथील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा घेतलेला निर्णय धाडसी आहे. या धाडसाने घेतलेल्या निर्णयाबद्दल उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन केले आहे.

तत्पूर्वी, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, या मागणीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्यात संघर्ष यात्रा काढली होती. राज्यातील जवळपास १५ जिल्ह्यांतून ही संघर्ष यात्रा काढली. चंद्रपूरपासून निघालेल्या या संघर्ष यात्रेचा समारोप पनवेलमध्ये करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 8:00 pm

Web Title: farmers loan waiver maharashtra opposition leaders sangharsh yatra ends panvel sharad pawar attack on bjp government
Next Stories
1 मुंबईत उभं राहिलं डबेवाल्यांचं शिल्प
2 गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
3 नरेंद्र मोदी आणि राजकीय नेत्यांनी वाहिली किशोरी आमोणकर यांना श्रद्धांजली
Just Now!
X