शरद पवारांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सहभाग

मुंबई  :  शेतकरी आणि कामगार कायद्यांच्या विरोधात राजभवनवर मोर्चासाठी नाशिकहून निघालेले शेतकरी आंदोलक रविवारी मुंबईत दाखल झाले. आझाद मैदानात उद्या होणाऱ्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आदी सहभागी होणार आहेत.

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेच्या नेतृत्वाखाली राज्याच्या २१ जिल्ह्य़ांमधून शेतकरी व कामगार हे नाशिकहून मुंबईत दाखल झाले.

केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. दिल्लीच्या सीमेवर गेले दोन महिने शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून  राजभवनवर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अनिल नवले यांनी सांगितले.  शनिवारी हा मोर्चा वाहनांमधून नाशिकहून मार्गस्थ झाला होता. इगतपुरीत मुक्काम के ल्यावर रविवारी सकाळी घाटनादेवी येथून कसाऱ्यापर्यंत आंदोलक पायी आले. सुमारे तीन तासात घाट उतरून खाली आल्यावर वाहनांमधून मोर्चेकरी मुंबईकडे रवाना झाले. ठाणे शहर व मुंबईत मोर्चाचे स्वागत करण्यात आले. सायंकाळी वाहनांमधून मोर्चेकरी आझाद मैदानात गेले.

शेतकरी व कामगार कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी सांगितले. आझाद मैदानात उद्या सकाळी जाहीर सभा होईल. या सभेत डाव्या पक्षांच्या नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते सहभागी होतील. त्यानंतर दुपारी दोन वाजता मोर्चा राजभवनकडे कू च करेल. राजभवनावर जाण्याचा निर्धार कायम असल्याचे डॉ. नवले यांनी सांगितले.

पालिकेकडून मोर्चेकऱ्यांना मदत

मोर्चासाठी रविवारी संध्याकाळपासूनच शेतकरी मोठय़ा संख्येने मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली. परिणामी, आझाद मैदान परिसरात मोर्चेकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. मोर्चा लक्षात घेऊन पालिकेने स्वच्छतेसाठी सफाई कामगार, पिण्यासाठी पाणी आणि फिरत्या शौचालयांची व्यवस्था केली. त्याचबरोबर करोनाचा संसर्ग लक्षात घेऊन मोर्चेकरी शेतकऱ्यांना मुखपट्टी आणि सॅनिटायझरचे वाटपही सुरू केले. मोर्चामुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून पालिकेने आझाद मैदान परिसरात वैद्यकीय शिबिराची  व्यवस्था करण्यात आली असून डॉक्टर आणि परिचारिकांचे एक पथक तेथे तैनात करण्यात आले आहे. गरज भासल्यास करोना चाचणीही करण्यात येत आहे, असे ‘ए’ विभाग कार्यालयातील साहाय्यक आयुक्त चंदा जाधव यांनी सांगितले.

कडेकोट बंदोबस्त

’संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या वतीने सोमवारी मुंबईत होणाऱ्या आंदोलनात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

’ वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवू नये यासाठी मुंबई पोलिसांनी आझाद मैदानाभोवती सुमारे शंभर अधिकारी आणि ५०० अंमलदारांचा फौजफाटा तैनात के ला आहे.

’याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या नऊ तुकडय़ा या बंदोबस्तात असतील. ड्रोनद्वारे या संपूर्ण आंदोलनावर लक्ष ठेवले जाईल, असे पोलीस प्रवक्ते चैतन्य एस. यांनी स्पष्ट के ले.