News Flash

शेतकरी आंदोलन : अकाली दलाच्या शिष्टमंडळाने घेतली उद्धव ठाकरेंची भेट

दिल्लीतील बैठकीचे दिले निमंत्रण

मुंबई : शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिरोमनी अकाली दलाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

शिरोमणी अकाली दलाच्या शिष्टमंडळाने रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा असेल असे आश्वासन दिल्याची माहिती अकाली दलाच्या नेत्यांनी दिली.

भेटीनंतर अकाली दलाच्या नेत्यांनी सांगितले, “शेतकरी आंदोलनादरम्यानच्या सर्व कार्यक्रमांना आपला पाठिंबा असेल. दिल्लीत दोन आठवड्यांनंतर होणाऱ्या शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीलाही ते हजेरी लावणार आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला त्यांचा पाठिंबा असेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले”

शिरोमणी अकाली दल आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष याआधी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सदस्य होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध आहेत. शिवसेनेने महाराष्ट्रात भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याचे निश्चित केले आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, त्यानंतर शिवसेना वर्षभरापूर्वी एनडीएतून बाहेर पडली. तसेच मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांना कडाडून विरोध करताना शिरोमणी अकाली दलाने काही महिन्यांपूर्वी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या उग्र आंदोलनात अकाली दलाचा सहभाग असून या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळवण्याचा आणि हे कायदे रद्द करण्यास भाग पाडण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचा अकाली दलाचा प्रयत्न आहे. याच उद्देशाने अकाली दलाच्या शिष्टमंडळाने मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याची विनंती केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2020 2:57 pm

Web Title: farmers protest akali dal delegation meets uddhav thackeray in mumbai aau 85
Next Stories
1 मुंबई : लोकल ट्रेनमध्ये महिलेशी गैरवर्तन करणाऱ्याला दोन वर्षांचा तुरुंगवास
2 शरद पवारांनी केलं ट्विट, डॉ. आंबेडकरांना अभिवादन करत म्हणाले…
3 लालबागमध्ये सिलेंडरचा स्फोट; २० जण होरपळून जखमी
Just Now!
X