कांद्यांच्या दरवाढीबद्दल ओरड होत असली तरी शेतकऱ्याला जेव्हा दोन रुपये किलो दर दिला जातो, तेव्हा काय केले जाते, असा सवाल करीत, ‘शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळाला पाहिजे,’ असे परखड मत महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना व्यक्त केले. गरज भासल्यास सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत कांद्याचे वितरण करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कांद्याची साठेबाजी करणाऱ्यांवर धाडी घालण्याची कारवाई गेल्या तीन दिवसांपासून सुरू करण्यात आल्याची माहिती खडसे यांनी दिली. दरम्यान, चांगल्या प्रतीचा कांदा ८० रुपये किलोवर गेल्याने आणि राज्य सरकार परिणामकारक उपाययोजना करीत नसल्याने दरवाढीविरोधात जनतेमध्ये तीव्र संताप आहे.  ग्राहकाला कांदा योग्य दरात मिळालाच पाहिजे, पण शेतकऱ्याचा कांदा जेव्हा दोन रुपये किलोने विकला जातो, तेव्हा कोणी मदत करीत नाही. त्यालाही त्याचा उत्पादनखर्च मिळेल, असा दर मिळाला पाहिजे, असे खडसे यांनी सांगितले.